Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

गंगाबाई श्रीशैल बनगोंडे वय 62 रा:- बनशंकरी निवास, विरशैव नगर,विजापूर रोड,सोलापूर हिचा खून केल्याप्रकरणी इंडी येथील वकिली करणारा सिद्धगौडा उर्फ सिद्धगौडाप्पा बाबूगौडा पाटील वय 34,रा. इंडी,जिल्हा विजापूर, याचेवर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्ही.जी.मोहिते साहेब यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की,यातील आरोपी सिद्धगौडा याची बहिण शिल्पा हिचे लग्न मयताचा मुलगा राहुल याचे बरोबर सन 2015 साली झाले होते. लग्नानंतर शिल्पा ही सासरी सहा महिने व्यवस्थित राहिली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद-विवाद झाल्याने शिल्पा हिने आरोपी सिद्धगौडा यास बोलावून घेऊन माहेरी निघून गेली होती.शिल्पा ही सन 2016 पासून माहेरीच होती व नोंदविण्यासाठी बऱ्याचशा बैठका झाल्या व त्यामध्ये काहीही तडजोड झाली नाही. शिल्पास न नांदण्यास मयत गंगाबाई हीच जबाबदार आहे अशी आरोपीची खात्री झाली होती. मार्च 2016 मध्ये आरोपीने मयत गंगाबाई हीस जाळून टाकण्याची धमकी दिली होती याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 12/6/ 2017 रोजी मोटारसायकलवर येऊन स्वतःची ओळख पटू नये म्हणून डोक्यावर हेल्मेट घालून तसेच मोटारसायकलची नंबर प्लेट दिसू नये म्हणून ती कपड्याने झाकून विरशैव नगर येथील गंगाबाई राहत असलेल्या घरी जाऊन गंगाबाई हिस कुर्‍हाडीने वार केला व पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटवून देऊन जीवे ठार मारले. तसेच आरोपीस मयताच्या घरात जाताना समोरील साक्षीदार अंजली राजमाने व खून करून घरातून बाहेर पडताना त्यांचा भाडेकरू प्रमोदसिंह रावत याने देखील पाहिले होते व या दोघांनी ओळख परेडमध्ये आरोपीस ओळखले होते.सदर बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल अण्णासाहेब मोहिते यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी.उशिरे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्रक दाखल केले होते.

खटल्याचे सुनावणीच्या वेळी सरकारतर्फे एकंदर 24 साक्षीदार तपासण्यात आले होते तसेच सी.सी.टी.व्ही, फुटेज देखील पडताळणी केली होती.

खटल्याचे युक्तिवादाच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयताचा मृत्यू हा शॉर्टसर्किटने जळून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही,घटनेची फिर्याद ही उशिराने दाखल झालेले असल्यामुळे ती विश्वासार्ह नाही व तसेच सी.सी.टी.व्ही फुटेज पुरावा हा संदिग्ध आहे व तसेच आरोपीस मयताच्या घरात जाताना व बाहेर पडताना पाहणारे साक्षीदारांचे जबाब देखील उशिराने नोंदविले असल्याने त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे अनेक मुद्दे मांडले,ते मुद्दे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे एडवोकेट अभिजीत इटकर एडवोकेट सतीश शेटे तर सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *