Big 9 News Network
एकीकडे देशात कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचे लक्षात घेता १२ वीची परीक्षा घ्यायलाच हवी असे मत महाराष्ट्र वगळता बहुतांश राज्यांनी व्यक्त केले आहे. या परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक १ जून रोजी महत्वाची घोषणा करणार आहेत. बारावीची परीक्षा कशी घ्यावी याबाबत सीबीएसईने दोन पर्याय मांडले आहेत.तसेच राज्यांतील शिक्षण मंडळे १२वीच्या परीक्षेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात असेही सीबीएसईने (CBSE) म्हटले आहे.
१२ वीच्या परीक्षेबद्दल राज्यांनी आपली मते मंगळवारी, २५ मेपर्यंत केंद्र सरकारला कळवावीत असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर संजय धोत्रे यांच्यासमवेत विविध राज्यांचे शिक्षणमंत्री उपस्थित होते. कोरोना साथीमुळे १२ वीची परीक्षा न घेता वेगळा मार्ग काढावा असे मत महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत व्यक्त केले.
१२ वीची परीक्षा घेण्यापूर्वी सर्व परीक्षार्थीना लस देण्यात यावी अशी सूचना दिल्ली व केरळच्या राज्य सरकारांनी केली आहे. पश्चिम बंगालने मात्र १२वीची परीक्षा रद्द करण्याबाबत अद्याप काहीही ठरविले नसून एक आठवड्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. १२ वीची परीक्षा होणार की होणार नाही याविषयी पालक व विद्यार्थ्यांच्या मनात जो गोंधळ निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षा लक्षात घेऊनच योग्य निर्णय लवकरच घेण्यात येईल असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.
यामध्ये महाराष्ट्राचे भूमिका अशी –
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेता अन्य पर्यायांचा विचार करायला हवा, अशी भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली. दहावीच्या परीक्षांबाबात एक- दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.