मंगळवेढ्यात 25 बेडचे डीसीएच सुरु करणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

पंढरपूर, दि. २३: मंगळवेढा तालुक्यातील कोरोनाबाधित गरीब व गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, नगराध्यक्षा अरुणा माळी, पंचायती समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ, विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसिलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी श्री.चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिंदे यांच्यासह तालुक्यातील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेडचे हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे . तसेच खाजगी रुग्णालयांनी डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविड सेंटर सुरु करण्याबाबत प्रस्ताव दिल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास प्रशासन आवश्यक उपाययोजना करीत आहे.

तालुक्यातील होम आयसोलेशनमधील रुग्णांचे प्रमाण कमी करुन त्यांना कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात यावे. यासाठी आणखी कोविड केअर सेंटर वाढविण्यासाठी कार्यवाही करावी. पोलीस प्रशासनाने संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर नागरिक फिरणार नाही याची दक्षता घ्यावी. उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी.

यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी भोसले यांनी यावेळी बैठकीत दिली.