मोठी बातमी | ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर होणार मोफत उपचार

Big 9 News Network

एकीकडे कोरोना रुग्णांची वाढ तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसचा त्रास. यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील १३० शासनमान्य सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत ‘म्युकरमायकोसिस’च्या सर्व रुग्णांना मोफत उपचार करून घेता येतील, असे राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्पष्ट केले. यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

म्युकरमायकोसिस संदर्भातील सुमोटो फौजदारी जनहित याचिकेवरील सुनावणी सोमवारी न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. बी. यू. देबडवर यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावेळी मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी शासनाच्या वतीने निवेदन केले. म्युकरमायकोसिसवरील उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत केले जातील.

सर्व रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार आणि आरोग्य हमी सोसायटी मार्फत त्याची – पूर्तता केली जाईल, असे १८ मे च्या सुधारित शासन निर्णयात म्हटले आहे, याकडे न्यायालयाचे मित्र ऍड. सत्यजित बोरा यांनी लक्ष वेधले.

योजनेत उपलब्ध खाटांची संख्या व इतर माहिती दर्शनी भागी लावावी, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.