Big 9 News Network
एकीकडे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याकरीता चाळीस पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गस्ती पथकाला विशेष वाहनेदेखील दिली आहेत.
यासोबत ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध आणि माहिती गोळा करण्याचे काम गस्ती पथकाद्वारे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वृत्त वाहिनीला दिली. जवळपास चार हजार रुग्ण होम आयसोलेशनच्या अंतर्गत उपचार घेत होते.
यापुढे होम आयसोलेशन पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू होत आहेत. त्यामुळे गावातीलच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपचार घेता येईल. रुग्णांनी प्राथमिक अवस्थेतच उपचार केंद्रात दाखल व्हावे. यासोबत संचारबंदीच्या निर्बंधांचे पूर्णत: पालन व्हावे, याकरिता ४० पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथके रात्रंदिवस ग्रामीण भागात कार्यरत राहतील. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यांची वाहनेही जप्त होतील. रोज चारशे ते पाचशे दंडात्मक कारवाया होत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्यामुळे पोलीस पथकांना सहकार्य करा असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.