Big9news Network
महेश हणमे /9890440480
सोलापुरातील स्मार्ट सिटीचा डंका संपूर्ण राज्यभर पसरला आहे. खड्डेपूर शहर अशी सर्व सोलापूरकरांना मान खाली घालायला लावणारी ओळख स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यानी निर्माण केली आहे.
आज शुक्रवारी दुपारी पद्मा टॉकीज समोरील ‘त्या’ ड्रेनेज,जलवाहिनी जाणारे चेंबर जेसीबीच्या माध्यमातून फोडण्यात आले. कालच सीईओ पाटील यांनी हे काम बरोबरच आहे असे ठासून सांगितले होते.मग, जर काम बरोबरच होते तर नंतर बदलणार कशासाठी?? आणि आता तोडले कशासाठी..?? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
त्याचं झालं असं की स्मार्ट सिटीच्या भव्य दिव्य कार्यक्रमाअंतर्गत पुर्वभागात पद्मा टॉकीज जवळ जोमात काम सुरू होते. तेथे चक्क ड्रेनेजच्या चेंबर मधून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन घालण्यात आली होती. कन्ना चौकाजवळील पद्मा टॉकीज समोर भररस्त्यावर नवीन ड्रेनेज लाईन व त्यामध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या अजब- गजब प्रकाराबद्दल नागरिकांमधून आक्षेप घेण्यात आला. चुकीच्या पद्धतीने जलवाहिनी टाकल्यामुळे येणाऱ्या काळात त्या पाईपमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी शिरण्याचा,पाणी झिरपण्याचा धोका असल्याचे त्यांचे म्हणणे होते. आणि बघताबघता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी ही पोस्ट फिरली. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे- पाटील यांनी हे काम बरोबरच आहे असे ठासून सांगितले. चेंबर बांधण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर ड्रेनेज लाईन वळविण्यात येईल, असे ही त्यांनी पुढे सांगितले होते.
ही माहिती दै. सकाळ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच नेटिझन्सनी पुन्हा संताप व्यक्त केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी दुपारी पद्मा टॉकीज समोरील ‘त्या’ ड्रेनेज,जलवाहिनी चेंबर जेसीबीच्या माध्यमातून फोडण्यात आले.मग, जर काम बरोबरच होते तर नंतर बदलणार कशासाठी?? आणि आता तोडले कशासाठी..?? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
जागोजागी खड्डे, कामाचा दर्जा हीनता, केलेले रस्ते पुन्हा खोदणे, एकाच जागेतून म्हणजेच चेंबर मधून पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी सोडण्याची करामत इथल्या इंजिनियर मंडळींनी केली आणि त्यांच्यावर वरदहस्त ठेवला तो स्मार्ट सिटी CEO पाटील यांनी…मला कोण विचारतो या अविर्भावात स्मार्ट सिटी CEO यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बाऊन्सरची फौजपण ठेवली आहे. अशी चर्चा त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते.
(एबीडी म्हणजे एरिया बेस्ड डेव्हलपमेंट ) क्षेत्रातील जवळपास 26 कामे मार्गी लागली आहेत तर अजून प्रस्तावित 14 कामे शिल्लक आहेत काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील असे वारंवार ढेंगळे पाटील यांनी सांगितले.पण ,तसे होताना दिसत नाही.
सोशल मीडियावर अक्षरशः स्मार्ट सिटी च्या नावाने शिमगा केलेला आहे परंतु निगरगट्ट असलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी खड्डेपूर ओळख पुसा आणि लवकरात लवकर कामे पूर्ण करा असा सज्जड दम दिला परंतु हा सुक्का दम ठरला.!
महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्यापासून महापौरांपर्यंत सगळे सांगून थकले. पण परिस्थिती जैसे थे राहिली.
स्मार्ट सिटी अभियानाचे सहसचिव कुणाल कुमार यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीत कामे पूर्ण करा.कुठल्याही कामाला मुदतवाढ मिळणार नाही सेकंड फेज अर्थात या प्रकल्पाचा दुसरा टप्पा नसल्याचेही आपल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले होते.
नागरिक म्हणाले…
आळीमिळी – गुपचिळी !
ड्रेनेजच्या लाईन मधूनच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन
शहरातील व्यंगचित्रकार उमेश शहाणे यांनी आळीमिळी गुपचिळी या व्यंगचित्रातून स्मार्ट सिटीच्या कामाची चिरफाड केली. या पोस्ट ला अनेक लाईक मिळाले तर कित्येकांनी हि पोस्ट शेअर केली.
आज शुक्रवारी दुपारी चेंबर फोडण्यात आले. यावेळी संभाजी आरमार चे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी अशा प्रकारे संताप व्यक्त केला.
धन्य तुम्ही आणि धन्य तुमचा कारभार..
स्मार्ट प्रशासनाचा निर्बुध्द कारभार….प्रसार माध्यमातून काम बरोबर आहे असं रेटून सांगायचं आणि प्रत्यक्षात बांधलेला चेंबर तोडून टाकायचा….वा..रे ढेंगळे-पाटील….धन्य तुम्ही आणि धन्य तो तुमचा स्मार्ट कारभार….
श्रीकांत डांगे
अध्यक्ष संभाजी आरमार
सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट…
आता मात्र निर्लज्जपणाची हद्द झाली राव….
एवढं धडधडीत चुकीचे काम करुन सुद्धा ढेंगळे पाटील नावाचा सनदी अधिकारी म्हणतो “केलेले काम बरोबरच आहे.”
सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामात पद्मा टॉकिज समोर ड्रेनेज चेंबर मधुन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेली, यावर टिकेची झोड उठवल्यावर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा मुख्य कार्यकारी अधिकारी ढेंगळे पाटील म्हणतो केलेले काम बरोबरच आहे.हि मात्र निर्लज्जपणाची हद्द झाली.
जर काम बरोबरच आहे तर नंतर बदलणार कशासाठी??
याच स्मार्ट सिटीच्या कामामुळे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तरी या असंवेदनशील माणसाला काही वाटले नाही.
तिथे या माणसाला भर चौकात जोड्याने मारला तरी काही फरक पडणार नाही.
हा माणुस व त्याचे सहकारी हे संपुर्ण सोलापुरचे गुन्हेगार आहेत.
योगीन गुर्जर
सामाजिक कार्यकर्ते
स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. त्यांच्या खाजगी स्वीय सहायकांनी पाटील हे परगावी गेले असल्याची माहिती दिली.
Leave a Reply