Big9news Network
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून मागील आठवड्यापासून “माझे मुल माझी जबाबदारी” आणि “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या दोन अभियाना अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या ठिकाणी सुरू असून आजतागायत 31 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. त्याचप्रमाणे अनेक मुलांमध्ये किरकोळ आजार दिसून आले असून त्या आजाराच्या अनुषंगाने या मुलांवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. हे दोन अभियान सुरू करण्यामागचा उद्देश कोरोनाच्या संभाव्य तिसरा लाटेमध्ये मुलांना असलेला धोका लक्षात घेता त्यातून मुलांचे पूर्णपणे संरक्षण व्हावे. आता त्यापुढे जाऊन पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी या कोरोना काळात कशी घ्यावी याची परिपूर्ण माहिती असलेले माहिती पत्रक जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सीईओ स्वामी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तयार केले असून जिल्ह्यातील सर्व पालकांपर्यंत हे माहिती पत्रक पोहोचवले जाणार आहे.
या माहितीपत्रकाचे अनावरण आज नियोजन भवन येथे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद सय्यद व मध्यम आधिकारी रफिक शेख उपस्थित होते.
कोरोनाच्या कठीण काळात सोलापूरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी राज्याला आदर्शवत ठरणारे वेगवेगळे अभियान राबवून जिल्ह्यातील कोविड नियंत्रण उत्तम रित्या केले आहे. राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे नियोजन करताना माझे मुल माझी जबाबदारी व माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या दोन अभियानाची सुरुवात सीईओ स्वामी यांनी केली आहे. जिल्हाभर मुलांच्या आरोग्य तपासण्या होत असून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या अभियानाअंतर्गत चांगले काम करीत आहे. आज कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेत मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात विषयीचे माहितीपत्रक जनजागृतीसाठी आरोग्य विभागाने उपलब्ध केले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला या बाबीचा अभिमान वाटतो. असे प्रतिपादन यावेळी दत्तात्रय भरणे यांनी केले.
लवकरच आरोग्य यंत्रणेमार्फत या माहितीपत्रकाचे वितरण जिल्ह्यातील प्रत्येक पालकांपर्यंत केले जाणार असल्याचे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.