‘ऑपरेशन परीवर्ततन’ | नारी शक्तीने केली हातभट्टी दारू बंद

Big9news Network

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर गुन्हा दाखल करणे,समुपदेशन करणे,त्यांचे पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची निर्मीती होत असल्याने सदरचा तांडा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दत्तक गाव म्हणून घेतला आहे.’ऑपरेशन परीवर्ततन’ अंतर्गत मौजे मुळेगाव तांडा येथे पोलीस अधीक्षक व त्यांच्या पथकाने वेळोवेळी छापा घालून हातभट्टी दारू,रसायन व भट्टी साहीत्य मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच तेजस्वी सातपुते यांनी मुळेगाव तांडा येथील युवक वर्ग व महिलांच्या बैठका घेवून कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याबाबत समुपदेशन केले होते.त्यामध्ये महिलांनी फॅशन डिझायनींग व शिलाई मशिन ऑपरेटर ही कामे करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती.त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समन्वयातून जिल्हा उद्योग केंद्र,सोलापूर व MITCON यांच्या संयुक्त विद्यमाने
तेथील महिलांना फॅशन डिझायनींग व शिलाई मशिन ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती.त्यावरून आज शुक्रवार,दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मुळेगाव तांडा येथील एकूण ३० महिला सदर प्रशिक्षण घेण्यासाठी हजर राहील्या असून या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.