Big9news Network
राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. आज लोकसभेमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहेत.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3721 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेऊन 4375 कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या 3721 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 701 कोटी रुपये मदत देण्याचे आज केंद्र शासनाने घोषित केले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
सध्याच्या नुकसानीसाठी देखील तातडीने मदतीची विनंती
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकणात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थिक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेऊन तातडीने मदत करेल अशी अपेक्षा कृषिमंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली आहे.