Latest Post

Рейтинг Букмекеров Рейтинг Букмекерских Контор%3A Лучшие Букмекерские Конторы 2024 Онлайн подробный Сайтов Бк отзыва Пользователе Ücretsiz Casinos Oyunları

Big 9 News Network

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

सोलापूर, दि.28- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य 15 फूट उंचीचा ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शुक्रवारी नियोजन भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. या बैठकीस कार्याध्यक्षा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच सदस्य नगरसेवक चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब बंडगर, अशोक पाटील, गेना दोलतोडे, आदित्य फत्तेपुरकर, अस्मिता गायकवाड, सारिका पिसे आदी उपस्थित होते. समितीचे सदस्य आमदार रोहित पवार हे ऑनलाइन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वागत केले. समन्वयक प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची माहिती दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती गठीत केली असून त्याची पहिलीच बैठक शुक्रवारी पार पडली. विद्यापीठाच्या 480 एकर जागेत उभारत असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा व स्मारक उभारण्याचा निर्णय झालेला असून येथे चबुतरावर 15 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते ठरला. प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी ब्रांझमधील अहिल्यादेवींचे शिल्प तयार करण्यासाठी एक कोटी 90 लाख 40 हजार रुपये अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. शिल्पाचे विविध मॉडेल तयार करणार आहेत. त्यानंतर समिती सदस्यांनी शिल्प पाहून निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले.

शिल्प उभारण्याचा खर्च विद्यापीठाकडून केला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित लँडस्केप, सुशोभीकरण, चबुतरा निर्मितीसाठी विद्यापीठाचे वास्तुविशारद असलेल्या डिझाईन कंपनी, मुंबईकडून पाच कोटी खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. सदरील खर्च राज्य शासन करणार असून या निधीसाठी सर्व सदस्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जबाबदारी सोपविली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सोलापुरात लवकरात लवकर व्हावे आणि यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. आमदार रोहित पवार यांनीही अहिल्यादेवींचे आदर्श कार्य युवा पिढीला समजावे आणि त्यातून त्यांना दिशा मिळावी असे चांगल्या दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु, असे सांगितले.

चांगला आराखडा; लवकर काम पूर्ण करू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारकाचा चांगला आराखडा तयार केलेला आहे. भव्य पुतळ्यासाठी विद्यापीठाकडून एक कोटी 90 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत तर लँडस्केप, चबुतरा व सुशोभीकरणासाठी पाच-साडेपाच कोटी रुपये निधी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करून आवश्यक निधी मिळवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सोलापुरात उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *