Big9news Network
तो पहा लालबुड्या.. हा खाटीक आणि ती मुनिया..!
पर्यटन दिनानिमित्त नेचर वॉक उपक्रम
पर्यटन संचालनालय, वन विभाग यांच्या सहकार्याने इको फ्रेंडली क्लब आणि हॅपी टू हेल्प फाउंडेशनचा उपक्रम
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने विजापूर रोड परिसरातील सिद्धेश्वर वनविहारात सोलापुरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी नेचर वॉक उपक्रमाचे आयोजन करण्यात होते. अनेकांनी पहिल्यांदाच सिद्धेश्वर वनविहारात भटकंती केली. सोलापूर शहरात इतका सुंदर परिसर आहे हे माहीत नव्हते, आज पर्यटन दिनाच्या निमित्ताने नेचर वॉक करून आनंद झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लब आणि हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पर्यटन संचनालयाच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला होता. सोलापूर वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. सोलापूर शहराजवळ असलेले सिद्धेश्वर वनविहार हे निसर्ग पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पर्यटन दिनाच्या निमित्ताने सोलापुरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सिद्धेश्वर वनविहाराची माहिती देऊन भटकंती घडविण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमात सहभागी होऊन नेचर वॉकचा आनंद घेतला. तो पहा लालबुड्या.. हा खाटीक आणि ती मुनिया..! असा संवाद यावेळी ऐकू आला. उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे अभ्यासकांनी दिली.
वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक श्रीकांत पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे संजय भोईटे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद शेटे यांनी वनविहारातील जैवविविधतेसंदर्भात माहिती दिली. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी प्रास्ताविक केले. हॅपी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक मदन पोलके यांनी आभार मानले. अनेकजण पहिल्यांदाच सिद्धेश्वर वनविहारात आले होते. वन विहारातील जैवविविधता पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला.
या उपक्रमात नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष खुशाल देढीया, युवक अध्यक्ष अभय जोशी, हॉटेल असोसिएशनचे ऋत्विज चव्हाण, सोलापूर मुद्रक संघाचे नागेश शेंडगे, चित्रकार उन्मेश शहाणे, मोंढे उद्योग समूहाचे पवन मोंढे, सराफ व्यावसायिक नितीन अणवेकर, सोलापूर महापालिका पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, सेडाचे सदस्य चंद्रकांत शहापुरे, श्रीकांत अंजूटगी, विजय जाधव, निखिल शहा, पंचायत समितीचे अधिकारी राजेंद्र वारगड, गायत्री वारगड, विनय वरणगावकर, प्रकाश कुंभार, सुरेश खानापुरे, सोनाली खानापुरे, प्रसाद गोटे, सुनील थिटे, मनोज म्हेत्रस, अश्विनी म्हेत्रस, पवनकिशोर मुंदडा, मुरली सोनी, आनंद गाडे, शिवशरण गंगा, उज्वल जंगडेकर, भीमा वाघमारे, तेजस म्हेत्रे, अभास कमलापुरे, संकेत माने, यश माडे, प्रवीण जेऊरे, वैभव होमकर, निवृत्त पोलिस अधिकारी स्वामी, संकेत पोलके, रामा निरवणे, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक सटवाजी कोकणे, छायाचित्रकार ऋषी कोळी यांनी सहभाग नोंदविला.