आदेश | 31 डिसेंबर, नववर्षासाठी शहरात सुधारित आदेश

Big9news Network

हे आहेत नियम –

  1.  कोरोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी व दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे.
  2.  मदत व पुर्नवसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या उपरोक्त दिनांक २४/१२/२०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यात दिनांक २५ डिसेंबर २०२१ पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  3.  कोविड १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. डीएमयू / २०२० / सीआर-२२/डीआयएसएम १ दि.२७/११/२०२१ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत पुनर्वसन व विभाग, मंत्रालय मुंबई क्र. डीएमयू / २०२० / सीआर-९२/डीआयएसएम-१ दि. २४/१२/२०२१ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतल पालन करावे.
  4.  दिनांक ३१ डिसेंबर २०२१ व नूतन वर्ष २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहणेस परवानगी असेल.
  5.  सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरण व्यवस्था करण्यात यावी.
  6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व १० वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टिने घराबाहेर जाणे टाळावे.
  7.  ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. (परंतू शहरात दिनांक २५ डिसेंबर २०२१ पासून रात्री ०९.०० ते सकाळी ०६.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे पालन करण्यात यावे.)
  8.  नववर्षाचा स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.
  9.  नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. संबंधीतांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
  10.  फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनीप्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
  11.  कोविड १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महानगरपालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
  12.  तसेच या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर २०२१ व नूतन वर्ष २०२२ सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी / विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी.