दीड लाख पगाराचा इंजिनिअर करायचा चोऱ्या

Big9news Network

सुमारे दीड लाख रुपये पगार असणारा रेल्वेचा ए.सी. मेकॅनिकल सुटीच्या काळात जनावरांच्या चोऱ्या करायचा. त्याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडून दोन म्हशी, पिकअप वाहन व अन्य साहित्य, असा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

देवीदास शिवाजी काळे (वय ४२), गोविंद सरदार काळे (वय २४), अप्पा बाळू पवार (वय ५८ सर्व रा.करंबा, ता.उत्तर सोलापूर), किशोर खेलू पवार, चंद्रकांत बहादूर काळे (सर्व रा.मार्डी, ता.उत्तर सोलापूर), बालाजी पवार (रा. वडगाव, ता.तुळजापूर), दत्तात्रय भगवे (रा.करंबा), असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाड्या-वस्त्यांवरून जनावरांची चोरी, घरफोड्या, चोऱ्या झाल्या होत्या. याच चोऱ्यांमधील दोघे शहरातील डॉ. आंबेडकर चौक (पार्क चौक) येथे थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गोविंद काळे व अप्पा पवार या दोघांना ताब्यात घेतले. दीड महिन्यापूर्वी दोघांनी रेल्वेतील ए.सी. मेकॅनिकल देवीदास काळे, गोविंद पवार, मनोज काळे यांच्यासमवेत जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, अक्षय दळवी, चालक समीर शेख, महिला अमलदार मंजुळा धोत्रे, अनिसा शेख यांनी पार पाडली.