शेतकऱ्यांसाठी खुशखबर | ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान ; असे आहेत फायदे

Big9news Network

ड्रॅगनफ्रुट कमलकन हे एक निवडूंग परिवारातील अत्यंत महत्वपूर्ण फळ आहे. औषधी गुण, पोषकद्रव्ये याचा विचार करून 2021-22 पासून कृषी विभाग एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी40 टक्के अनुदान देत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि ॲन्टीऑक्सीडन्टमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रती हेक्टर चार लाख रूपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरुन 40 टक्क्यांप्रमाणे एक लाख 60 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.

लागवडीची पद्धत ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडामध्ये 3 मी. X3 मी., 3 मी X 2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सिमेंट काँक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.