Big9news Network
इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूरचे ‘नो स्पिटींग’ अभियान
रस्त्यावरून वाहन चालवणारे वाहन धारक नेहमी वाहन चालवताना थुंकताना आढळून येतात. सोलापूरमध्ये हे सर्रास आढळून येते यापुढील काळात सोलापूर हे न थुंकणाऱ्यांचे शहर म्हणून नावलौकीक वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूरच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘नो स्पिटींग, अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा होते.
सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी थुंकल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो, हे आपण कोरोनाच्या काळात अनुभवलोय. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणारे वाहन धारकही सर्रासपणे थुंकतात. त्यामुळे रोगाचा प्रसार तर होतोच परंतु अनेकदा इतरांच्या अंगावर थुंकी उडून वाद होतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून थुंकण्याचे टाळले पाहिजे. सोलापूरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्यात भर म्हणून न थुंकणाऱ्याचे शहर म्हणूनही नाव लौकीक वाढवला पाहिजे असेही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
थुंकणे ही आपली संस्कृती नाही, परंतु अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अनेकजण सर्रासपणे थुंकतात त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो तसेच रोगाचा प्रसार होतो सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणूनच नो स्पिटींग अभियान राबवण्यात येत आहे या अभियानातून लोकांमध्ये पोस्टर, स्टिकरच्या माध्यमातून तसेच आता शाळा सुरू होत आहेत त्यामध्ये जावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येणार आहे.असे आपल्या प्रास्ताविकामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांनी सांगितले. त्यानंतर नो स्पिटींग च्या फलकाचे अनावरण पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयएमएच्या सचिव डॉ. तन्वांगी जोग यांनी केले तर आभार डॉ.संजय मंठाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.मोनिका उबंरदंड, डॉ. घटोळे, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. संध्या रघोजी, डॉ. देशपांडे यांच्यासह आयएमएचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.