- कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे
- कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
*कोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक*
मुंबई दिनांक ३०: दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.
आपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.
*मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार*
कोरोनाच्या संकटाबरोबर राज्याने चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामाना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना केलेल्या वाढीव मदतीप्रमाणे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगतांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अंतर्गत करावयाच्या मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला.
*कायमस्वरूपी उपाययोजना*
दरवर्षी येणाऱ्या वादळाची शक्यता लक्षात घेऊन सागरतटीय भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर शासन लक्ष केंद्रीत करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये धुप प्रतिबंधक उपाययोजना, भुमीगत वीज वाहक तारा, भुकंपविरोधक घरांचे बांधकाम याबाबींचा समावेश असल्याचे ते म्हणाले
*दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत*
दहावीच्या परीक्षा यावर्षी न घेता मुल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी बारावीच्या परीक्षांबाबतचा निर्णयही शासन लवकरच घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की ज्या परीक्षांचे महत्व (नीट , सेट, जेईई) विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी अधिक आहे त्या परीक्षांचे निर्णय घेतांना केंद्र सरकारने देशभरासाठी एकच शैक्षणिक धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. ही मागणी आपण पंतप्रधान आणि केंद्र
सरकारकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.
*ऑनलाईन शिक्षण सुविधांचे सक्षमीकरण*
मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी, या क्षेत्रात क्रांतीकारक निर्णय घेण्यावर राज्य काम करत असल्याचे म्हटले.
*कोरोनामुळे अनाथ बालकांसाठी राज्याची योजना*
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पुर्ण पालकत्व राज्यसरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक पावलागणिक शासन त्यांच्यासोबत राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
*निर्बंध आणि मदत*
राज्यातील जनतेची सुरक्षितता ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असल्याने नाईलाजाने निर्बंध लावण्याचा कटु निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २.७४ लाख मे.टन मोफत अन्नधान्याचे वाटप, ५५ लाखांहून अधिक मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांसाठी ८५० कोटी हून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम मजुरांना १५५ कोटी ९५ लाख, घरेलू कामगारांना ३४ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अधिकृत फेरीवाल्यांना करावयाच्या मदतीसाठी ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वितरण सुरु आहे. कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घोषित ३३०० कोटी पेक्षा अधिक म्हणजे ३८६५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मदतीचे हे वाटप अजूनही सुरु असल्याची माहिती देतांना त्यांनी महाराष्ट्र सुरक्षित राहावा याचबरोबर गोरगरीबांची आबाळ होऊनये याची काळजी शासनाने घेतल्याचे सांगितले
*कोरोना स्थितीचे तुलनात्मक विश्लेषण*
मुख्यमंत्र्यांनी 19 सप्टेंबर 2020 ची आणि आजची कोरोना रुग्णस्थिती याची तुलनात्मक आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की, अजूनही हा आकडा खुप खाली गेलेला नाही. राज्यात १९ सप्टेंबर २०२०ला दैनंदिन रुग्णसंख्या २४ हजार ८८६ होती ती आज २४ हाजर ७५२ आहे. तेंव्हा सक्रिय रुग्ण ३ लाख १ हजार ७५२ होते आज ३ लाख १५ हजार ४२ आहेत. यात दिलाशाची बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे तेंव्हाचे प्रमाण ७८ टक्के होते जे आज ९२.७६ टक्के आहे. मृत्यूदर ही त्यावेळेसच्या २.६५ वरून १.६२ टक्के एवढा कमी झाला आहे.
काही जिल्ह्यात, ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ते आपल्या वागणुकीवर आणि नियमांच्या पालनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आताचा कोरोना व्हायरस संसर्ग अधिक वेगाने करतो, झपाट्याने पासरतो आणि रुग्ण बरे होण्यास वेळ लागत आहे. या विषाणुने दीर्घ काळासाठी ऑक्सीजनची आवश्यकता वाढवली आहे. आपल्याला १८०० मे.टनच्या आसपास ऑक्सीजनची गरज होती. आपली क्षमता १२५० मे.टन होती अशा कठीण परिस्थितीत इतर ठिकाणांहून ऑक्सीजन आणून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे कठीण काम प्रशासकीय यंत्रणेने केले असल्याचे कौतूकोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले
माझा डॉक्टर
म्युकरकायकोसीसचे ३ हजार रुग्ण राज्यात असून टास्कफोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर, डॉक्टर भुमकर यावर उपाययोजना आणि उपचार सुचवित असल्याचे ते म्हणाले. माझा डॉक्टरांशी आपण सातत्याने संवाद साधत असल्याचे सांगतांना आता पावसाळ्याच्या तोंडावर कोविड, नॉनकोविड रुग्ण ओळखून त्यांना योग्य उपचार देण्यामध्ये डॉक्टरांची भूमिका खुप महत्वाची असल्याचे व कोविड रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार देण्याचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या डॉक्टरांनी घ्यावी असेही ते म्हणाले.
*उपलब्धतेप्रमाणे लस*
तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यासाठीचे नियोजन शासनाने आधीच सुरु केल्याचे सांगतांना त्यांनी बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची माहिती दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास शासन समर्थ असून एक रककम देऊन ही लस खरेदीची राज्याची तयारी असली तरी लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता जस जसी लस येईल तस तशी सर्वांना लस उपलब्ध करून दिली जाईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्यांनी आतापर्यंत २.२५ कोटी नागरिकांना लस दिल्याची माहिती दिली.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला शासनाने प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.
कोरोनासोबत जगतांना अर्थचक्र कसे गतिमान ठेवता येईल यादृष्टीने राज्यातील उद्योग व्यवसायिकांशी चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या काळात ही कृषी आणि संलग्न क्षेत्र खुली ठेवली असल्याची शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच गर्दी न करण्याचे आवाहन ही केले.
*कोरोना नियमांचे पालन करा*
राज्यात नवीन ऑक्सीजनचे प्लांट आपण उभे करत आहोत. यासाठी ३ महिने ते १८ महिन्याचा कालावधी लागेल तोपर्यंत आपल्याला अतिशय सावधपणे पुढे जावे लागत असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य पुढे करावे, कोराना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांची उपलब्धता, त्याची सध्याची स्थिती याचीही माहिती दिली.
*तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका*
कोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही ज्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा केली जावी हे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचे निमंत्रक न होता अशी भाषा करणाऱ्यांनी ज्या कुटुंबांनी आप्त स्वकीय गमावले, कर्ते गमावले अशा कुटुंबांच्या मदतीसाठी कोविड योद्धे होऊन काम करावे असे आवाहन केले.
…