सोलापूर,दि.५: सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, सिद्धेश्वर पेठ येथे असलेल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि महाराजांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे, राज्य शासनाने हा दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे….त्यानिमित्त.
जिल्हा ग्रंथालय हे बालके, महिला, वृद्धांपासून ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवक-युवतींसाठी पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देत आहे. याठिकाणी बालक, महिला, नियतकालिके, वृत्तपत्रे, स्पर्धा परीक्षा, प्रौढ नागरिक यांच्यासाठी वेगवेगळी दालने केली आहेत. या दालनातून आपल्या आवडीचे, महत्वाचे पुस्तक जागेवर बसून वाचू शकता किंवा सभासद असेल तर घरी घेऊन जाऊ शकतो. याठिकाणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील आणि लिपीक प्रदीप गाडे आदी कामकाज पाहतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके
अ.रा. कुलकर्णी आणि ग.ह. खरे लिखित आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केलेली मराठ्यांचा इतिहास खंड 1, खंड 2 आणि खंड 3, मराठ्यांचा इतिहास (प्रा. गफूर शेख), राजा शिवछत्रपती पूर्वाध (बाबासाहेब पुरंदरे), नामदेवराव जाधव यांची गनिमी कावा, शिवराय-स्वराज्यासाठी लढलेल्या राष्ट्रनिष्ठ मुस्लिमांचा खरा इतिहास आणि शिवराय- छत्रपतींचा वैज्ञानिक, आर्थिक, प्रशासकीय खरा इतिहास, मराठेशाही वास्तुशिल्प (म.श्री. माटे), ऐतिहासिक कागदपत्रे (राजाराम देशपांडे), प्राचार्य डॉ. एस.ए. बाहेकर यांची छत्रपती शिवाजी महाराज व परकिय सागरी सत्ता, शिवजन्मतीर्थाचे निर्णायक संशोधन आणि युगप्रवर्तक राजा छत्रपती शिवाजी महाराज ही पुस्तके शिवाजी महाराज यांच्याबाबतचा इतिहास पुनर्जिवीत करतात. जिल्हा ग्रंथालयात ही पुस्तके उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत.
याचबरोबर डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी यांची शिवछत्रपतींची पत्रे खंड 1 आणि खंड 2, काशिनाथ मढवी यांचे जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी, शिवकालिन महाराष्ट्र (वा.कृ. भावे), नी.सी. दीक्षित यांचे छत्रपती आणि पेशवे आणि नाथ माधव यांची स्वराज्याचा श्रीगणेश, स्वराज्याचा कारभार, स्वराज्याचे परिवर्तन, स्वराज्यातील दुफळी, स्वराज्यावरील संकट ही पुस्तकेही ग्रंथालयात आहेत.
शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचे वेगळे दालन
जिल्हा ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ ग्रंथाचे वेगळे दालन करण्यात आले आहे. वाचकांना सहज पुस्तक उपलब्ध होईल, अशा रितीने पुस्तके ठेवण्यात येत आहेत.
कसे व्हाल सभासद
जिल्हा ग्रंथालयाचा सभासद होण्याची सोपी पद्धत आहे. ग्रंथालयात उपलब्ध असलेला सभासद अर्ज भरून द्यावा. दोन वर्षासाठी 500 रूपये डिपॉजिट आणि 120 रूपये फी भरून आपण सभासद होऊ शकता.
लाभ काय असेल
सभासद झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही विषयावरील पुस्तक ग्रंथालयात किंवा घरी घेऊन वाचता येते. ऐतिहासिक, पौराणिक, विज्ञान, पर्यटन, प्रवासवर्णने, निसर्ग, पर्यावरण, आत्मकथा, कथा, कादंबऱ्या, शालेय विद्यार्थ्यांना लागणारी अभ्यास पुस्तके, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी इथे पुस्तकांची रेलचेल आहे. ग्रंथालयात विविध प्रकारची वर्तमानपत्रेही वाचण्याची सुविधा आहे.