*सोमवारपासून टाळेबंदी शिथिल: मध्यरात्री शासनाचे आदेश जारी*
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना टाळेबंदी राहणार की शिथिल होणार या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र सरकारने रात्री उशिरा जाहीर केले आहे. शिल्लक ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्हिटी च्या आधारे टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा लेखी आदेश जारी केला आहे.
दोन दिवसापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
अखेर राज्य सरकारने रात्री उशिरा भलामोठा शासन आदेश जारी करून लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने या आदेशात स्पष्ट केले आहे.
प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते.अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करून राज्य सरकारने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
नव्या आदेशामध्ये शहरी आणि ग्रामीण अशी स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट ठरवण्यात आले असून महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) हे नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे राज्य सरकारच्या देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
साधारण मार्गदर्शक तत्त्वे:-
पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.
स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.
स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचाली वर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा
पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी
पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. हा पहिला स्तर मानला जाईल. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसऱ्या स्तरात मोडतील.
पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, असा तिसरा स्तर मानला जाईल. तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील, असं सूत्र निश्चित करण्यात आला आहे.
दहा ते वीस टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील. तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील. पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील, असे आदेश आहेत.