पर्यावरणीय घटकांचा विवेकाने वापर व्हावा – डॉ. नभा काकडे

Big9news Network

विकासाच्या प्रगतीच्या नावाखाली माणसांनी नैसर्गिक पर्यावरणातील विविध घटकांवर आघात केले. त्यांचे शोषण केले, परिणामी तापमान वाढ, वारंवार येणारी वादळे, अवर्षण, अतिवृष्टी, भूकंप यामुळे मानवी जीवन व सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. त्यासाठी भारताने लोकसंख्या नियंत्रण व निसर्गातील पाणी, जमीन, खनिज संपत्ती इत्यादी घटकांचा विवेकाने वापर केला पाहिजे.
शाळा व महाविद्यालयातून पर्यावरण सैनिक निर्माण झाले पाहिजेत असे प्रतिपादन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. नभा काकडे यांनी केले.

त्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा, नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व समाधान माध्यमिक प्रशाला दहिटणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय वेबिनार मध्ये बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंगचे राष्ट्रीय खजिनदार डॉ. श्रीकांत येळेगावकर हे होते.

प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुंबई मुख्यालयातून फॅमिली प्लॅनिंगच्या सेक्रेटरी जनरल डॉ. कल्पना आपटे, असिस्टंट सेक्रेटरी जनरल अमिता धानू व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. एन. बी. तेली, समाधान प्रशालेचे मुख्याध्यापक इरफान शेख उपस्थित होते.

या वेबिनारचे औचित्य साधून दहिटणे येथील समाधान माध्यमिक प्रशालेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगत गायकवाड यांनी केले. तर आभार रमणलाल सोनीमिंडे यांनी मानले.