मासा गळाला | सोलापूर जिल्हा परिषदेत लाच घेताना एकास अटक

Big9news Network

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील दलित वस्ती योजनेचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला लाच घेताना सोमवारी समाजकल्याण सभापतीच्या अँटी चेंबरमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे दिवाळीनंतर फटाका फुटला अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवात झाली.

बसवेश्वर स्वामी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून कक्ष अधिकारी पदावर समाज कल्याण विभाग येथे कार्यरत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली. समाज कल्याण सभापती यांच्या चेंबरमध्ये सदर कारवाई झाली.

मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी गावच्या सरपंचाने गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामसभेत ठराव करून तो ठराव समाजकल्याण विभागाकडे दिला होता.त्या कामास मंजुरी देण्यासाठी बसवेश्वर स्वामी याने तीस हजाराची लाच मागितली होती 30 हजार रुपये लाच घेताना सोमवारी समाजकल्याण सभापती संगीता धांडोरे यांच्या अँटी चेंबरमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर समाज कल्याण सभापती यांचे पती कार्यालयातून पसार झाले. बसवेश्वर स्वामी हे मागील अनेक वर्षापासून समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधार योजना या टेबलवर होते, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. शेवटी सोमवारी लाच घेताना त्यांना पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजतात संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली.

2 नोव्हेंबरला लाचेची रक्कम देण्याचे ठरलं , गुरुवार नंतर म्हणजे दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दिवाळी सुट्टी लागणार असल्याने सदर ‘पाकीट’ दिवाळी सुट्टीनंतर आल्यावर सोमवारी आठ नोव्हेंबर रोजी देण्याचे ठरलं. त्यानुसार स्वामी याने तक्रारदाराला थेट समाजकल्याण कार्यालयात बोलावून घेतले परंतु, झेडपी परिसरात ट्रॅप लावून बसलेल्या लाच लुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. सभापतींच्या अँटी चेंबरमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना स्वामी यास रंगेहाथ पकडले.

स्वामी याला आज मंगळवारी न्यायालयात नेण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक ,चंद्रकांत कोळी यांच्या पथकाने केली.
सभापतींच्या दालनात ‘लाच’ समाज कल्याण च्या श्रीमती संगीता धांडोरे यांच्या अँटी चेंबरमध्ये कक्ष अधिकारी बसवराज स्वामी याने तक्रारदाराला बोलावले होते. स्वामी याने ही रक्कम कोणाच्या सांगण्यावरून घेतली की याचे रॅकेट कुठपर्यंत आहे याची सखोल तपास होणार आहे. सध्या जरी एक मासा गळाला लागला असला तरी जिल्हा परिषदेच्या समुद्रात अनेक मोठमोठे मासे टपून बसलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात दबक्या आवाजात बोलली जात होती.