सहकाराच्या पडझडीतही गोकुळ का आहे दीपस्तंभ?

BIG9 NEWS NETWORK:

शतकभरानंतर सहकारानं राज्यात दमदार पावलं टाकली… सहकाराच्या शंभरीत अनेक संस्थांनी चढउतार पाहिले.. काही संस्था लयास गेल्या, काही कशाबशा तग धरून आहेत.. तर काही दिमाखाने डौलत यशाच्या शिखरावर उभ्या आहेत. यातीलच एक संस्था आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पाक संघ अर्थात गोकूळ.सहकाराची पडझड सुरू असताना गोकुळ या वादळातही दीपस्तंभासारखा कसा टिकून आहे, का ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करतेय, कोणी कितीही टीका आणि आरोप केले तरी ग्रामीण भागातील दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी यांचा विश्वास दृढ का आहे यामागील कारणे काय आहेत. हे जाणून घेणं नक्कीच रंजक आणि प्रेरणादायी आहे. गोकुळचा लोगो किंवा चिन्ह आहे चार थेंबांचं.. हे चिन्हच प्रेरणादायी आहे. या चिन्हातील प्रत्येक थेंबाला अर्थ आहे पहिला थेंब आहे दुध उत्पादक शेतकरी,दुसरा गावातील दुध संघ, तिसरा गोकूळ आणि चौथा ग्राहक. दूध व्यवसायाच्या या उत्कर्षात प्रत्येक थेंबाचा खोलवर विचार करण्यात आला आहे.

कोणतीही संस्था चालते प्रशिक्षित कर्मचारी वर्गामुळे, ग्रामीण भागातील दूध उत्पादक संस्थांमधील कर्मचारी प्रशिक्षीत असतील तरच प्रगती साध्य करता येणार म्हणून गोकूळमार्फत संस्था कशी चालवायची याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जाते. सहकारातील कायदे नियम यांचं प्रशिक्षण दिलं जातं. कोल्हापूर सांगली आणि परिसरात प्रशिक्षण केंद्रामार्फत आयुर्वेदीक उपचारावर संशोधन केलं जातं. जनावरांच्या औषधात असलेल्या प्रतीजैविकांमुळं त्याचा परिणाम दुधावर होण्याची शक्यता असते त्यामुळं आता आयुर्वेदिक उपचार करण्यावर भर दिला जातो. जनावरांची केंद्रनिहाय तपासणी केली जाते. मस्टायटीसारख्या रोगांवर लगेच उपचार केले जातात. हैद्राबाद येथे लस तयार केली जाते. उपयोग… दूध उत्पादक शेतकरी हाच गोकुळच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळं शेतकरी आणि त्याची जनावरे चांगली असावीत. यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात. त्यासाठी ६० वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत असतात. जनावरांना चार तासांत तपासले जाते. तर ४५० कृत्रिम रेतन सेवक आहेत ज्यांच्या माध्यमातून जातीवंत जनावरं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. दुध उत्पादन वाढ करण्याचा प्रयत्न गोकुळच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. पंढरपुरी म्हशींसाठी प्रोत्साहन देण्यात आले. कारण दुध उत्पादनातील शेतकरी अल्पभूधारक आहे. लाख रूपयांच्या म्हशी आणायच्या आणि धोका पत्करायचा हे त्यांना शक्य नसल्याने गोकुळने अनुदानाचा आधार दिला. १५ हजार रुपये अनुदान दिले जाते. यामुळं दरवर्षी दहा हजार नवीन गायी, म्हैशी तयार होतात.. पशुवैद्यकीय सेवेबरोबरच पशुखाद्य पुरवले जाते. पशुखाद्याचे पैसै दुधाच्या बिलातून वसूल केले जातात. वेगळे पैसै द्यायची गरज लागत नाही. तसंच सकस पशुखाद्य असल्याने शेतकरी गोकुळचेच पशुखाद्य घेतात. म्हणूनच आता गोकुळचे पशुखाद्य चारशे टन रोज उत्पादन केले जाते. आता उत्पादनाची ही क्षमता ५०० टन होणार आहे सध्या १५० टन क्षमता आहे. केवळ दोन लाख संकलनावरून सुरू झालेला गोकुळचा प्रवास आज १५ लाखांवर पोहोचलाय ते यामुळेच. आता कर्नाटक, सांगली, सोलापूरातून दुध गोळा करावे लागणार आहे, गोकुळला असलेली प्रचंड मागणी हे यामागील कारण आहे. पार्किन्सन, अल्झायमर सारख्या रोगावर आता देशी गायीच्या तूपाचा उपचार केला जातो. यासाठी आता देशी गायींसाठी प्रोत्साहन दिले जाते आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसै अधिक मिळतील असा विश्वास गोकुळला वाटतो.

गोकुळ ग्रामविकास सचिव योजनाही महत्त्वाची ठरतेय. गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी तंबाखू, दारु सेवनापासून दुर रहावं यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे त्यांचे कुटूंब आनंदी रहाते. महिला नेतृत्व विकास योजनाही खूप महत्त्वाची आहे. स्वच्छता अभियान, स्वच्छ दुध उत्पादन, महिलाचे २००० बचत गट तयार करण्यात आले असून त्यांना स्वयंरोजगार निर्माण करून देण्यात आले आहेत. ८०० महिला दुध संस्था आता कार्यरत आहेत आणि त्या संस्था कशा चालवाव्या याचं प्रशिक्षण दिलं जातं. झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली जाते. गोकुळच्या उत्पन्नातील ८२ टक्के वाटा शेतक-यांना परत केला जातो. केवळ १८ पैसे व्यवस्थापनासाठी वापरले जातात. हीच गोकुळच्या यशाची कारणे आहेत. म्हणूनच गोकुळ आज दीपस्तंभासारखा उभा राहिला आहे.