मुंबई – कोरोनाचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवण्यात आलं होतं. मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. याच पार्श्वभूमीवर अजुनही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं सलग दुसऱ्या वर्षी वार्षिक मुल्यमापन होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
वर्षभरात चौथीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू काही ठिकाणी सुरु झाल्या तर काही ठिकाणी शक्य झालं नाही. त्यातही अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेलेे असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच पहिली ते आठवीच्या वार्षिक मुल्यमापनाबाबतची माहिती सुद्धा यावेळी गायकावड यांनी दिली.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थी आहेत त्यांचे वर्षभराचे मुल्यमापन करणे गरजेचे आहे. मात्र यंदाही असं मुल्यमापन करणं शक्य नाही. राज्यातील पहिली ते आठवीचे जे विद्यार्ती आरटीई अंतर्गत येतात त्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.