सोलापूर, दि. ३ : बार्शी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये आणखी १०५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आज खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेतली. त्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आला. डॉ. ढेले यांनी आज नर्गिस दत्त हॉस्पिटल आणि जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली. बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल बोपलकर, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. अनिल माळी, आयएमएचे बार्शी अध्यक्ष डॉ. प्रकाश मोहिरे, डॉ. तरंग शहा उपस्थित होते. बैठकीत खासगी दवाखान्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे, कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नियमानुसार देणे याबाबत चर्चा झाली. डॉ. तरंग शहा यांनी १५ ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी तयारी दाखवली. नर्गिस दत्त हॉस्पिटलमध्ये चाळीस ऑक्सिजन बेड सुरु करण्याचे प्रशासनाने मान्य केले.
हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर चाचणी करणारी मशीनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले. डॉ. ढेले यांनी कोठारी आणि पाटील पैथॉलॉजी लैबोरेटरीस भेट देऊन रैपिड ऐंटीजेन टेस्ट करण्याबाबतची प्रक्रिया, माहिती संकलित करण्याची पध्दती याबाबतची माहिती दिली. बैठकीत बार्शी मधील खासगी वैद्यकीय विशेष तज्ञ उपस्थित होते.