वॉर रूम | कोरोना रोखण्यासाठी होणार सज्ज ; वाचा सविस्तर

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सोलापुरातील सेतू कार्यालयात कोरोनाची वॉर रुम तयार करण्यात येणार आहे. ही वॉर रुम सोमवारपासून (ता. 19) कार्यान्वित होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करणे, ग्रामीण भागातील कोरोना संदर्भातील सर्व महत्वाची माहिती एकत्रितरित्या संकलित करणे, कोरोनाच्या लढाईत जिल्हास्तरिय प्रशासन, तालुकास्तरीय प्रशासन व ग पातळीवरील यंत्रणा यांचे योग्य नियोजन करण्यासाठी व त्यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी ही वॉर रुम महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयातील 90 कर्मचाऱ्यांवर या वॉर रूमची जबाबदारी असणार आहे. आठ तासांची एक शिफ्ट असून एका शिफ्टमध्ये तीस कर्मचारी काम करणार आहेत. चोवीस तासात आठ तासांच्या तीन शिफ्ट असणार आहेत. कोरोनाच्या वॉर रूमला आवश्यक असलेली माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक कॉन्टॅक्ट पर्सन नियुक्त केला जाणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी या सर्वांचा समन्वय या वॉर रुमच्या माध्यमातून साधला जाणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आढावा बैठक घेतली. या वॉर रूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.