हृदयद्रावक | युवा पत्रकाराची आत्महत्या; वडील कोरोनाने गेले तर आई व भाऊ ‘पॉझिटिव्ह’…

सोलापूर शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली.
विविध प्रसारमाध्यमांमध्ये पत्रकारिता करत असलेल्या एका युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

प्रकाश धर्मा जाधव (वय 35, रा. सुशीलनगर, जुळे सोलापूर) असे या पत्रकाराचे नाव असून दोनच दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचा कोरोनाने बळी घेतला होता.तर, आई आणि सख्खा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर प्रकाश खचला होता.

पोलिस खात्यात असलेला भाऊ व आईसाठी लागणाऱ्या रेमेडीसिव्हीर इंजेक्‍शनसाठी त्याची ससेहोलपट होत होती. सलग तीन ते चार दिवस रेमेडीसिव्हर इंजेक्शन मिळू शकले नाही. यामुळे मानसिक दृष्ट्या खचलेल्या  पत्रकार प्रकाश जाधव याने नैराश्यपोटी आपल्या हाताची नस कापून जीवनयात्रा संपविली.

संगमेश्वर कॉलेजमध्ये पत्रकारिता व जनसंवाद विभागात तो प्रथम आलेला होता. शहरातील विविध प्रसार माध्यमांमध्ये त्याची होतकरू पत्रकार म्हणून ओळख निर्माण झाली होती. नैराश्‍येच्या भावनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

प्रकाश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आई आणि पोलिस खात्यात असणारा भाऊ अशा दोघांनाही कोरोनाची लागण झालेली होती. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आईला उपचारासाठी रेमेडेसिव्हीर इंजेक्‍शन लागणार होते. त्यासाठी तो दिवस-रात्र फेऱ्या मारत होता. आई,भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने  प्रकाश होम क्वारंटाइनमध्ये होता. त्याने आपल्या हाताची नस कापून जीवनयात्रा संपवली. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
यामुळे सोलापूर शहरातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.