इ-स्मार्ट ! थेट.. गटारीच्या पाण्यात गंजतेय ओपन जिम ; श्री सिद्धेश्वर मंदिराचे पावित्र्य धोक्यात

BIG 9 NEWS NETWORK

थेट.. गटारीच्या पाण्यात गंजतेय ओपन जिम ; सिद्धेश्वर मंदिराचे पावित्र्य धोक्यात
स्मार्ट अधिकाऱ्यांचे जाणार का लक्ष ?

सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत श्रीसिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे. यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वॉकिंग ट्रॅक, विविध प्रकारची सुशोभित झाडी,रोपे,ओपन जिम यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.यासाठी तब्बल 15 कोटीहून अधिक खर्च आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र याच परिसरात असलेल्या ओपन जिमची ओपनिंग पूर्वीच दुरावस्था होत आहे, गटारी च्या दुर्गंधीयुक्त पाण्यात जिम अडकलीय.


स्मार्ट कामात तरबेज असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र केवळ जागेवर या विविध वस्तू बसवण्याचे काम केले परंतू त्याची डागडुजी, व्यवस्था, संरक्षण केले नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून ओपन जिम असलेल्या लगतच असलेल्या भिंतीला भगदाड पाडण्यात आले आहे,आणि त्यातून वर राहणाऱ्या रहिवाशांनी ड्रेनेज आणि गटारीचे पाणी बिनधास्तपणे खाली सोडून दिलय. त्यामुळे अजून जिमच्या कामाला मुहूर्त लागला नाही त्यातच ही सर्व साधने गंजण्याच्या तयारीला लागलीत.

श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यापूर्वी अण्णाबोमय्या महाराजांचे दर्शन घेतले जाते. या पवित्र स्थानाच्या जवळूनच हे दुर्गंधीयुक्त घाण पाणी सिद्धेश्वर तलावात जाऊन पडते, सकाळच्या दर्शनाच्या वेळी तसेच व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

स्मार्ट अधिकाऱ्यांनी ताबडतोब मंदिर परिसराचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या तसेच ओपन जिम चे नुकसान करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याबाबत स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या दोन दिवसापासून CEO हे परगावी गेले असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असणारे CEO यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा येथील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.