जागो ग्राहक जागो |कॅरी बॅगेचे 10 रुपये; दुकानदाराने भरला 1500 रुपये दंड

बऱ्याच वेळा आपण दुकानात किंवा एखाद्या शो रूममध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी जातो. खरेदी केलेली वस्तू ठेवण्यासाठी आपली स्वत:ची कॅरी बॅग नसते. तेव्हा आपण त्या दुकानदाराकडून बॅग घेतो, मात्र त्या बॅगेचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. गुजरातमधील एका दुकानात असाच प्रकार घडला. 10 रुपयांच्या बॅगेवरून सुरू झालेले हे प्रकरण अखेर ग्राहक न्यायलयापर्यंत गेले.याची मोठी चर्चा परिसरात घडली.

एका ग्राहकाने  या ठिकाणच्या मोठ्या एका रिटेल स्टोअरमध्ये 2,846 रुपयांच्या सामानाची खरेदी केली. खरेदी केलेले सामान ठेवण्यासाठी त्या व्यक्तिकडे बॅग नसल्याने त्याने दुकानदाराकडे बॅगेची मागणी केली. कॅरी बॅग मागितल्यामुळे दुकानदाराने बॅगेवर 10 रुपयांचा चार्ज लावला, पण ग्राहकाने बॅगेचे 10 रुपये देण्यास नकार दिला आणि कॅरी बॅग मोफत मिळत नाही, असे ग्राहकाला सांगितले, मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. ग्राहकाने या प्रकरणाची तक्रार ग्राहक न्यायालयात केली. त्यामुळे स्टोअरमालकाला ग्राहकाला व्याजासहित त्याचे पैसे परत करावे लागले.गुजरातमधील अहमदाबाद येथील ग्राहक न्यायालयात ही घटना घडली.

ग्राहक न्यायालयाने 8 टक्के व्याजासह ग्राहकाला पैसे परत करण्याचे आदेश दिले. ग्राहक न्यायालयाने मानसिक छळासाठी 1000 रुपये आणि कायदेशीर शुल्कासाठी 500 रुपये देण्याचे निर्देश या किरकोळ दुकानदाराला दिले. तसेच हे पैसे 30 दिवसांत ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले. शिवाय ज्या दिवसापासून हे प्रकरण न्यायालयात गेले त्या दिवसापासून 8 टक्के व्याज दुकानदाराला लावण्यात आले.

ग्राहकाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ‘जेव्हा जेव्हा तो वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जातो तेव्हा दुकानात कुठेही असे नमूद केलेले नाही की, त्याला कॅरी बॅगेसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. जर दुकानदाराला पैसे हवे असतील तर त्याने कॅरी बॅगेचे पैसे द्यावे, असे स्टोअरमध्ये लिहायला हवे होते.’