Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर,दि.7: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

पीक विमा योजनेसाठी 2021 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ www.pmfby.gov.in कार्यान्वित झालेले आहे. जिल्ह्यातील अधिसुचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 साठी भारती ॲक्सा जनरल एन्शुरन्स कं.लि. या विमा कंपनीची नेमणूक केली आहे. कंपनीच्या संपर्कासाठी 19 वा मजला, परिणी क्रुसेंझो जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, एम.सी.ए क्लबसमोर बांद्रा, पूर्व मुंबई 400051, दूरध्वनी क्र.022-49181500 ई मेल-customerservice@bhartiaxa.com टोल फ्री 18001037712 असा आहे.

 जोखीम बाबी

  1. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान

खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी न झाल्यास विमा संरक्षण मिळेल.

2.पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान

सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळेल.

3.पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट

टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई मिळेल.

4.स्थानिक नैसर्गिक आपत्ती

या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र  जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.

5.काढणी पश्चात नुकसान

ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्याबांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी/ काढणी नंतर  सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या  अधिसूचित पिकाचे  काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषानुसार भरपाई निश्चित केली जाते.

काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीम अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप (crop insurance app)/संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/कृषि व महसूल विभागाला कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक आहे.

            बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रासह विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करावेत.

            कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचा / न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र  योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होणार नसल्याबाबत घोषणापत्र नसेल तर सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करुन योजनेत सहभागी करुन घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.

समाविष्ट पिके

जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कांदा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

पिकनिहाय हेक्टरी विमा हप्ता दर

भुईमूग शेतकरी हिस्सा 350 रूपये, विमा संरक्षित रक्कम 17500 रूपये, खरीप ज्वारी हिस्सा 460 रूपये, विमा संरक्षित रक्कम 23 हजार रूपये, बाजरी 330 रूपये, विमा संरक्षित रक्कम 16,500 रूपये, सोयाबीन 680 रूपये, विमा संरक्षित रक्कम 34 हजार रूपये, मूग 360 रूपये, विमा संरक्षित रक्कम 18 हजार रूपये, उडीद 380 रूपये, विमा संरक्षित रक्कम 19 हजार रूपये, तूर 550 रूपये, विमा संरक्षित रक्कम27 हजार 500 रूपये, मका 110 रूपये, विमा संरक्षित रक्कम 5500 रूपये, कांदा 2750 रूपये विमा संरक्षित रक्कम 5500 रूपये अशी आहे.

योजनेत सहभागासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी/ मंडळ कृषी अधिकारी/कृषी पर्यवेक्षक/कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक काळजीपूर्वक देण्याचे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *