BIG 9 NEWS NETWORK
५ गावांमध्ये राबविणार प्रकल्प : हत्तुरचा प्रकल्प यशस्वी
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने नॅचरल रिसोर्सेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. याचा उपयोग आता ५ गावांना करून देणार असल्याची माहिती ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य विभागातील सहयोगी प्रा. प्रशांत स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यात विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली कन्स्ट्रक्शन अभ्यासात फ्युरो सिमेंट एलेमेंट टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे तब्बल ५० टक्के कमी खर्चात कमी वजनाचे तितकेच टिकाऊ सिमेंट एलेमेंट बनविता येऊ शकते. तसेच वायू प्रदूषण न होता ४० टक्के कमी किमतीत बनणाऱ्या कॉम्प्रेस्ट अर्थ ब्लॉक टेक्नॉलॉजी हे नव्या प्रकारे मातीच्या विटा तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांनी घेतले आहे.
पाळीव प्राण्यांना प्रोटीनयुक्त खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजोला (Azola) वनस्पतीची लागवड, ट्रॅडिशनल हिलींग लाईफ स्टाईल, आजूबाजूच्या वनस्पतींचा दैनंदिन जीवनातील उपयोग, बायो एनर्जी, विंड एनर्जी, पावसाच्या पाण्याच्या नियोजनाच्या विविध पद्धती, बायो टॉयलेट्स आदींचा अभ्यास आणि प्रात्यक्षिकही या विद्यार्थ्यांनी केल्याचे प्रा. प्रशांत स्वामी यांनी सांगितले. १० दिवसांचे हे प्रशिक्षण २७ विद्यार्थ्यांच्या गटाने पूर्ण केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना याद्वारे नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने कार्यक्रम आखला आहे. यातील हत्तुर गावातील प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे. हत्तुर गावापासून सीना नदी जवळ असूनही या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. गावात सर्व्हेक्षण करून पाण्याचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळा तसेच महाविद्यालयातील आणि खासगी प्रयोगशाळेत त्याचे परीक्षण केले. अभ्यासाअंती सोडियम, मॅग्नेशियम, आयर्न आदी घटक २०० फूटांपर्यंतच्या पाण्यातही दिसून आले. रासायनिक खतांचा भडिमार केल्याने उद्धभवलेल्या या समस्येवर मात करण्यासाठी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी फिल्टर मीडियाचा प्रयोग केला आहे. झुओलाईट, वाळू आदींचा उपयोग करून अवघ्या २५० रुपये खर्च असलेले हे फिल्टर मीडिया तयार करण्यात आले आहे. याचे प्रशिक्षण गावातील युवकांना देऊन त्यांना शुद्ध पाण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रा. स्वामी यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या उन्नत भारत अभियानांतर्गत हत्तुरप्रमाणेच टाकळी, कुरघोट, वांगी, औराद या गावातही असे प्रयोग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांना अथवा महाविद्यालयांना अशा प्रकारचे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी प्रा. प्रशांत स्वामी यांच्याशी 9822346532 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. पोतदार,प्रा. एस. व्ही. कुलकर्णी प्रा. प्रशांत स्वामी, डॉ. आर.बी. दरेकर, डॉ. एस. बी. गदवाल, प्रा. एस.बी. कुलकर्णी, प्रा. टी. डी. मसलेकर, प्रा. आर. बी. कुलकर्णी, प्रा. आर. डी. मेत्री
आदी उपस्थित होते.
केंद्र शासन करणार मदत
शाश्वत विकासाबाबतचा एखादा प्रयोग विद्यार्थ्यांनी ‘स्टार्टअप’ म्हणून सुरू केल्यास आयआयटीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.
काय आहे नार्डेप ?
कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र अंतर्गत नार्डेप (नॅचरल रिसोर्सेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) हा प्रकल्प चालविला जातो. या ठिकाणी देश विदेशातील आयआयटी, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या ३५ वर्षांपासून शाश्वत विकासाबाबतचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते. येथील कार्य पाहून ‘ग्रीन रामेश्वरम’ प्रकल्पाची अंमलबजावणी नार्डेपच्या माध्यमातून करावी यासाठी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच हस्ते २०१४ मध्ये ग्रीन रामेश्वरम प्रकल्पाचे उदघाटन झाले होते.
Leave a Reply