‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी

*‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल ?*

_‘यंदाच्या वर्षी 21 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर  2021 या कालावधीत पितृपक्ष आहे. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात सर्वांनी महालय श्राद्ध करण्याचे हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेले आहे._

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक सिद्धांत म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यू झाला असेल, तर त्यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, तसेच त्यांना सद्गती मिळावी, यासाठी श्राद्ध करतात. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धामुळे पितरांची त्रासांतून मुक्तता होते.

पितृपक्ष काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात. पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोचते. त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते. असे असले, तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या श्राद्धविधी कसा करता येईल, हा लोकांसमोर यक्ष प्रश्‍न आहे. त्या अनुषंगानेच हा लेखप्रपंच !

*‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पितृपक्षात शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करणे शक्य नसल्यास काय करावे ?*

सध्या कोरोनामुळे विविध सण, उत्सव आणि व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. ‘आपद्धर्म’ म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’

या काळातच ‘पितृपक्ष’ येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या पद्धतीने या वेळी तो नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा येऊ शकतात. अशा स्थितीत ‘श्राद्ध करण्याविषयी शास्त्रविधान काय आहे ?’, हे पुढे दिले आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, ‘हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे ?’, हे यातून शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित होते.

1. आमश्राद्ध करणे

‘आपत्काली, भार्येच्या अभावी, तीर्थक्षेत्री आणि संक्रांतीच्या दिवशी आमश्राद्ध करावे’, असे कात्यायनाचे वचन आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास संकल्पपूर्वक ‘आमश्राद्ध’ करावे. आपल्या क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तेल, तूप, साखर, बटाटे, नारळ, 1 सुपारी, 2 विड्याची पाने, 1 नाणे इत्यादी साहित्य तबकात ठेवावे. ‘आमान्नस्थित श्री महाविष्णवे नमः ।’ हा नाममंत्र म्हणत त्यावर गंध, अक्षता, फूल आणि तुळशीचे पान एकत्रित वहावे. ते साहित्य एखाद्या पुरोहिताला द्यावे. पुरोहित उपलब्ध नसल्यास वेदपाठशाळा, गोशाळा अथवा देवस्थान यांना दान करावे.

2. ‘हिरण्य श्राद्ध’ करणे

वरील करणेही शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे, म्हणजे आपल्या क्षमतेनुसार व्यावहारिक द्रव्य (पैसे) एका तबकात ठेवावेत. ‘हिरण्यस्थित श्री महाविष्णवे नमः ।’ किंवा ‘द्रव्यस्थित श्री महाविष्णवे नमः ।’ असे म्हणून त्यावर गंध, अक्षता, फूल आणि तुळशीचे पान एकत्रित वहावे. नंतर ते धन पुरोहितांना अर्पण करावे. पुरोहित उपलब्ध नसल्यास वेदपाठशाळा, गोशाळा अथवा देवस्थान यांना दान करावे.

3. गोग्रास देणे

ज्यांना आमश्राद्ध करणे शक्य नाही, त्यांनी गोग्रास द्यावा. जेथे गोग्रास देणे शक्य नसेल, त्यांनी जवळपासच्या गोशाळेला संपर्क करून गोग्रासासाठी म्हणून काही पैसे अर्पण करावेत.

वरीलपैकी आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध किंवा गोग्रास समर्पण केल्यानंतर तीळ तर्पण करावे. पंचपात्रीत (पेल्यात) पाणी घ्यावे. त्यात थोडे काळे तीळ टाकावे. अशाप्रकारे तीलोदक सिद्ध होते. तीलोदक सिद्ध झाल्यावर हयात नसलेल्या पितरांची नावे घेऊन उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यामधून त्यांना तीलोदक समर्पण करावे. गेलेल्या व्यक्तीचे नाव ठाऊक नसेल; पण ती व्यक्ती ज्ञात असेल, तर त्या व्यक्तीचे स्मरण करून तीलोदक समर्पण करावे. एरव्ही या सर्व विधींच्या वेळी पुरोहित मंत्र म्हणतात आणि आपण कृती करतो. पुरोहित उपलब्ध असल्यास त्यांना बोलावून वरीलप्रमाणे विधी करावेत. पुरोहित उपलब्ध नसल्यास या लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे भाव ठेवून विधी करावा. एखाद्याला कोणताही विधी करणे शक्य नसेल, तर त्यांनी निदान तीळतर्पण करावे.

4. ज्यांना वरीलपैकी काहीही करता येणे शक्य नसेल, त्यांनी धर्मकार्यासाठी समर्पित एखाद्या आध्यात्मिक संस्थेला अर्पण करावे.

श्री गुरुदेव दत्त हा नामजप अधिकाधिक वेळ करावा !

कलियुगात कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच आध्यात्मिक त्रास असल्याने श्राद्धपक्ष करण्याच्या जोडीला या काळात ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अधिकाधिक करावा.

*श्राद्धविधी करतांना करावयाची प्रार्थना !*

‘शास्त्रमार्गाला अनुसरून प्राप्त परिस्थितीत आमश्राद्ध, हिरण्य श्राद्ध किंवा तर्पण विधी (वरीलपैकी जे केले आहे, त्याचा उल्लेख करावा) केले आहे. याद्वारे पितरांना अन्न आणि पाणी मिळू दे. या दानाने सर्व पितर तृप्त होवोत. त्यांची आमच्यावर कृपादृष्टी राहू दे. आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त होवोत. दत्तगुरूंच्या कृपेने त्यांना पुढची गती प्राप्त होऊ दे’, अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करावी.

*कोरोना काळात ज्या ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली असेल तेथे विधीपूर्वक पिंडदान करून श्राद्ध करावे !’*