Big9news Network
“महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पाठिशी कायम विनाअट उभे राहून त्यांच्या प्रत्येक राजकीय विजयात अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या लिंगायत समाजाच्या तोंडाला या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. वारंवार अन्याय सहन करत असलेल्या लिंगायत समाजाच्या उद्रेकाला सामोरे जायची भाजपनेव तयारी ठेवावी.” अशा शब्दात आज कॉंगेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या जागेच्या वादावरून सध्या शहरात सुरू असलेल्या नाराजीलाच त्यांनी तोंड फोडले.
वाले पुढे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या जागेचा वाद शहरात पसरला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने बागेच्या जागेबाबत तक्रार केली होती. वादग्रस्त जागेची आज मोजणी होणार होती. किरकोळ तांत्रिक कारण देत सत्ताधाऱ्यांनी आज ती पुन्हा एकदा लांबणीवर टाकली. या मुळेच कायम सत्ताधाऱ्यांच्या पाठिशी विनाअट उभ्या राहणाऱ्या लिंगायत समाजाला सत्ताधाऱ्यांनी उपयोग होताच वापरून फेकून दिले असल्याची भावना या समाजात आहे.
शहराध्यक्ष वाले यांनी या पत्रकार परिषदेत पुढेही आरोप केले की, विद्यापीठाला नाव देतानाही सत्ताधाऱ्यांनी अशीच चालबाजी करत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे नाव देणे टाळले होते. येथील एसटी स्टॅंडला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्याचा आमदार देशमुखांचा विचारही आता बासनात गुंडाळला गेला आहे. सोलापूरकर लिंगायत समाजाला कायम धोका देणाऱ्या महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचे बिंग फुटले आहे. कायम एकनिष्ठ असणाऱ्या लिंगायत समाजाला जर अशी वागणूक मिळत असेल तर एक ना एक दिवस या लिंगायत समाजाच्या प्रचंड असंतोषाला भाजपला तोंड द्यावे लागेल. एकनिष्ठांची ही स्थिती तर बाकीच्यांची काय अवस्था केली असेल या सत्ताधारी भाजपने याचा आता समस्त सोलापूरकरांनी विचार करणे गरजेचे ठरले आहे. ज्या लिंगायत समाजाने कायम पाठिशी राहत तुम्हाला निवडून दिले त्यांना आपल्या कडील थोडीशी जागा देण्यास काय हरकत आहे? असा खोचक प्रश्नही वाले यांनी या निमित्त उपस्थित केला.
Leave a Reply