Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

लोकशाहीर शिवशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे
समाजसुधारक, लोककवी, मानवमुक्तीचे शिलेदार, शिवशाहीर भीमशाहीर, साहित्यरत्न तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर आण्णाभाऊ साठे हयांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्हयात वाळवा तालुक्यात वाटेगांव या लहान गावात झाला. आण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नांव वालुबाई साठे होते तर वडीलांचे नांव भाऊराव साठे होते. आण्णाभाऊ शाळेत शिकलेले नाहीत. केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णाव्दारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडुन दिली. त्यांनी दोन लग्न केलीत त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे हया होत. आण्णाभाऊंना तीन अपत्ये होती मधुकर, शांता आणि शकुंतला आण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होतो. आपले विचार कार्य व प्रतिमा यातुन लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर शिवशाहीर केवळ दिड दिवस शाळाा शिकलेले आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आज भारतात नव्हे तर जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरीत झालेले आहे.आण्णाभाऊ साठे यांनी स्वत:ला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झोकुन दिले होते. आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकुणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपुर्ण ठरलेले आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

कष्टकरी, दलित, शोषित, पिडीत यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. मुंबइ्र इतर साहित्यकांना गर्भश्रीमंत दिसते पण आण्णाभाऊंना तीच मुंबई विषम व्यवस्थेचे प्रतीक वाटते. आण्णाभाऊंच्या वेगळया जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे” अशी त्यांची विज्ञानवादी भुमिका होती. “जग बदल घालूनी घाव मज सांगुनी गेले भिमराव” अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती. आण्णाभाऊंचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजुचे आणि त्यांच्या अटितटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव आधोरेखित करणारे आहे. शाळेची पायरी देखील न चढलेल्या आण्णाभाऊ साठे यांनी 37 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोनाटये, 11 पोवाडे, 3 नाटके, शेकडो गाणी, लावण्या छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे ही खरोखरच अचंबित निर्माण गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या लहान वयात वाटेगावच्या परिसरातील पाटील-कुलकर्ण्यांच्या बेमुर्वतखेर वागण्याचा त्यांच्या अत्याचराच्या आणि चांगुलपणाचाही अनुभव घेतला होता. आण्णाभाऊंनी पहिल्यांदा कॉ. श्रीपाद डांगे, कार्ल मार्क्स कम्युनिस्ट विचारणीने प्रभावित झाले. तसेच आण्णाभाऊ साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. तांत्रिक दृष्टया पुर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती अश्या आण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड:मय, कथा, नाटय, लोकनाटय, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृध्द केले. तमाशा या कलेला लोकनाटयाची प्रतिष्ठा मिळवुन देण्याच श्रेय आण्णाभाऊंना जातं. पोवाडे, लावण्या, गीत, पद या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकिय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चवळीमध्ये त्यांनी शाहिरीतुन दिलेले योगदान महत्वाचे आहे.

1944 ला त्यांनी “लाल बावटा” पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली” ही त्यांची गाजलेली लावणी होती. आण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाडयातुन सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि त्यांच्या राष्ट्र्राध्यक्षांकडुन त्यांचा सन्मान देखील झाला. 16 ऑगस्ट 1947 रोजी वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चा मधील त्यांची घोषणा “ये आझादी झुठी है, देश कि जनता भुखी है” हे सत्य चित्रण मांडून गोरगरिबांची नस त्यांनी पकडली होती. त्यामुळे भारतातील सर्वसामान्य वंचित, उपेक्षित लोकांच वास्तव चित्र त्यांच्या लेखणीच्या माध्यमातुन प्रकट झालेल आहे. फकिरा या कादंबरीला 1961 साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कांदबरीचा पुरस्कार ही मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरा मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशंचे खजिने, धान्य लुटुन गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. वैजयंता कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. सावकरी करणाऱ्या लोकांचा आण्णाभाऊ आपल्या लेखातुन तीव्र विरोध केला आहे. माकडाची माळ ही भटक्या – विमुक्त समाजाच्या जीवनध्दतीचे अतिश्य सुक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजुर तमाशतला सोंगाडया अशा विविध भूमिका आण्णाभाऊ साठेंनी वठविल्या. आण्णाभाऊंनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत आणाभाऊंच्या एकापेक्षा एक क्षेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. आण्णा भाऊ साठेंचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता चौदा भारतीय भाषात तसेच जर्मन, इंग्रजी, झेक, पोलीश, रशियन इत्यादी परकीय भाषेत भाषांतरित झाले आहे. त्यांचे साहित्य जात, धर्म, देश भाषा इत्यादी बंधनांच्या पलीकडे पोहोचले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यीक कृतीतुन जे नायक उभे केले ते आजतागायत साहित्य विश्वापासुन दुर होते. अशा नायकांना नायक बनवुन त्यांनी उपेक्षितांना न्याय दिला. आण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये कल्पनेला धारा नाही. त्यांनी जीवंत पात्रे त्यांच दु:ख त्यांच्या व्यथा, कलह, वेदना प्रखर्षाने मांडल्या म्हणुन त्याचं साहित्य बहुजनवादी आहे. आदर्शवादी आहे, यथार्थवादी आहे. आंबेडकरवादी आहे, परिवर्तनवादी आहे. त्यामुळे आण्णाभाऊ हे आम्हांला प्रिय आहेत. वंदनीय आहेत. त्यांच्या जयंती निमित्य त्यांच्या विचारांना कोटी-कोटी प्रणाम.

ॲङ संघरक्षित (सुजित) उडाणशिव
सोलापूर
महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *