Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुंबई : आज दि.5 जुलै  रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सोबत गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज सुरु करण्याकरीता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत  यांच्या समवेत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोलापूरातील पॉलिटेक्निक बंद न करण्याचा व तसेच नवीन इंजिनिअरींग कॉलेज सूरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश संचालक, तंत्रशिक्षण श्री. धनराज माने यांना देण्यात आले.
या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली भुमिका मांडताना सांगितले कि, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग निर्णय क्र. मान्यता 2015/(143/2015) /ताशि-5/दिनांक.13.10.2016 या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाअंतर्गत सोलापूर येथे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह होता पण यासोबतच सोलापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अभ्यासक्रम हा टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जो अत्यंत चुकीचा व गोर-गरीब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असा होता. सोलापूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज बंद करण्यात येऊ नये यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटना व असंख्य पालकांनी निवेदनाव्दारे, प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

श्रेणी वर्धनामुळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधील पदवीका अभ्यासक्रम बंद केला गेला असता तर गरीब व हुशार विद्यार्थ्यांना खाजगी पॉलिटेक्निक मध्ये अवाढव्य शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागला असता किंवा त्यांना शिक्षणपासून वंचित रहावे लागले असते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी इतर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये 30 % कोठयामध्ये स्पर्धा करावी लागली असती. परिणामी सोलापूरातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असते.


गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज ही संस्था सन 1956 पासून चालू असून तेथे स्थापत्य, संगणक, विद्युत, अनुविद्युत व दुरसंचारण, यंत्र, माहिती तंत्रज्ञान व वस्त्रनिर्माण असे पदवीका अभ्यासक्रम संपूर्ण क्षमतेने यशस्वीरित्या सुरु आहे. या संस्थेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून इ. 10 वी, 12 वी व आय.टी.आय. नंतरचे विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील गरीब परंतू हुशार विद्यार्थी ज्यांना पदविका अभ्यासक्रमानंतर नोकरीची गरज असते अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हा चांगला पर्याय आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे अत्यल्प व माफक शैक्षणिक शुल्कात शिक्षण दिले जाते व सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 70 % विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.


या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संचालक तंत्रशिक्षण श्री. धनराज माने यांना सन 2022-23 साठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक व इंजिनिअरींग कॉलेज एकाच आवारामध्ये सुरु करण्याकरीता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सोलापूरातील हजारो विद्यार्थ्यांना सन 2022-23 पासून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोबत गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शासकीय सवलतीनुसार शिक्षण मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *