जिल्ह्याच्या डोक्यावर महामारीचे संकट घोंगावत आहे. अशा परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांच्या मनात अनेक विचार येऊन जातात. आज पर्यंत आलेल्या साथींच्या आजारांपैकी सद्य स्थितीत असलेली महामारी माणसापासून माणसाला तोडत आहे. बाधित रुग्ण प्रचंड तणावात असतो. अशा परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी जनजागृतीस कृतिशीलतेची जोड दिली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना बाधीत रुग्णांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. अनेक कोरोना बाधीत रुग्ण ताणतणावास सामोरे जात आहेत. त्या ताणतणावातून रुग्णांची परिस्थिती गंभीर होवून प्रसंगी मृत्यू होत आहेत आणि मृत्यू दर वाढत आहे. त्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे रुग्णांना ताणतणाव व्यवस्थापनावर कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन प्रबोधन करीत आहेत.
परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असलेल्या कामाचा भार व त्यातून मिळणारा वेळ याचा विचार केला तर प्रत्येक कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन प्रबोधन करणे शक्य नाही. या समस्येतून मार्ग काढत सीईओ स्वामी यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानाची ध्वनीफित व चित्रफित तयार करून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवल्या आहेत.
या ध्वनीफिती व चित्रफिती ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर व मशिदीतील लाऊडस्पिकरवरून व रिक्षांना स्पिकर लावून ग्रामस्थांना ऐकवल्या जात आहेत त्याच प्रमाणे गावोगावच्या कोविड केअर सेंटर मध्येही ऐकवले जात आहे. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये ताणतणाव कमी होवून त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. राज्यात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमाची व ग्रामीण भागात covid अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दखल घेऊन सीईओ स्वामी यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply