Breaking | राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन ; कार्यकर्त्यांवर पसरली शोककळा

सोलापूर,दि.27 : राष्ट्रवादीचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. यामुळे कार्यकर्त्यांवर आणि जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आमचा पैलवान कोरोनाला चारीमुंड्या चीत करणार आणि पुन्हा पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल म्हणत परतणार असा विश्वास समर्थकांच्या मनामध्ये होता. भारत भालके यांची धक्कादायक निधन वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत आहे.

ते 60 वर्षांचे होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भारत भालके हे कोरोनामुक्तदेखील झाले होती. मात्र, त्यांना पुन्हा एकदा अस्वस्थ जाणवू लागल्यानं त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. तिथं गेल्यावर त्यांना पोस्ट कोव्हिड झाला असल्याच निदान डॉक्टरांनी केलं होते.
त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

नाना ठरले जायंट किलर…

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. २०१९ साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी मुळ गावी सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान आ.भारत भालके यांच्या निधनानंतर संपूर्ण मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.