Breaking | सोलापूरला भूकंपाचे सौम्य हादरे ; नागरिकांनी भीती बाळगू नये – जिल्हाधिकारी

महेश हणमे /9890440480
सोलापुरात काल शनिवारी रात्री साधारण 11.57 नंतर भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे शहरातील काही भागात भिंतींना हादरे बसले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
काल सोलापुरातील शहर तसेच जिल्हा परिसरात पाऊस सुरू होता. याच दरम्यान शहरातील मध्यवर्ती भागातील नवी पेठ, दत्त चौक , सात रस्ता याठिकाणी काही घरांना हादरे बसले त्यामुळे हा भूकंप आहे अशी चर्चा जोरात सुरू झाली. किल्लारीचा भूकंप 30 सप्टेंबर रोजी झाला होता. काल रात्री झालेली घटना ही सप्टेंबर महिन्यातली आहे.याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

वोल्कॅनो डिस्कवरी च्या वेबसाईटवर याबाबत नोंद घेण्यात आली आहे.
सोलापूरच्या दक्षिणेला 185 किलोमीटर अंतरावर म्हणजेच बागलकोट परिसर, कर्नाटक या ठिकाणच्या भूगर्भातील हालचालीमुळे शहराला भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. या ठिकाणी केंद्रस्थानी तीव्रता 3.6 रिश्‍टर स्केलची होती. अशी माहिती वोल्कॅनो डिस्कवरीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
सोलापूर शहराच्या काही भागात भूकंपसदृश्य सौम्य हादरा जाणवला. मंगळवार पेठ ,भवानी पेठ ,चौपाड ,दक्षिण कसबा, सात रस्ता या भागात हादरा बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क करून सविस्तर माहिती घेत असल्याचे MH13 न्यूजच्या विशेष प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले.
याबाबत काही बातम्या येत आहेत.पण खात्री करून माहिती दिली जाईल.नागरिकांनी काळजी करू नये. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन युनिटला फोन करून माहिती घेत आहोत. नागरिकांच्या आणि प्रसारमाध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार शहर परिसरात बसलेला धक्का हा सौम्य आहे.काळजी करू नये.
श्री.मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी