प्राण देऊनही धर्म न पालटणारे छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार बलिदानदिन ( फाल्गुन अमावस्या, ११ एप्रिल २०२१ )

औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे : संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.
संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती : संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले . गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, “सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !” शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.

हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज ! : शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुद्धीकरणासाठी’ आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्‍न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान ! : संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हात पाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.

१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला’ म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एक निर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल’, असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.

धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे : शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.

संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली : संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या’, असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.

२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.

देश धरम पर मिटनेवाला
शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी,
एक ही शंभू राजा था ।।

– शाहीर योगेश

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावहः ।, म्हणजे स्वधर्म पाळतांना मृत्यू आला, तरी परधर्म स्वीकारण्यापेक्षा तो मृत्यू श्रेयस्कर आहे, असे धर्मतत्त्व आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड यातना सोसल्या मात्र स्वतःचे धर्मपरिवर्तन होऊ दिले नाही. प्राण देऊनही धर्म न पालटणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन हिंदूंनी यातून बोध घेऊया. जागृत हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांचे धर्मांतर होत असल्यास ते रोखण्यासाठी सिद्ध होऊया.

छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदानदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

संकलक : राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती