शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात आ. प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांना निवेदन दिले

Big9news Network

दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी सोलापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी 1) सन 1995 नंतरच्या रोजंदारी कर्मचारी यांना कायम करण्याबाबत. 2) आस्थापनावरील वाहन चालक पदे रिक्त असल्याने नवीन प्रस्ताव बनवून तात्काळ शासनाकडे पाठविण्यात यावे. 3) मलेरिया विभागाकडील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता (S.F.W.) या पदाकरीता मुदतवाढ मिळावी व इतर मागण्यांबाबत. 4) सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या Watag व WMS नुसार पगार काढण्याबाबतचे आदेश रद्द करण्याबाबत. 5) सोलापूर शहरातील अभ्यासिका अखंडीत चालु ठेवण्याबाबत. 6) सोलापूर शहरातील क्लासेस सूरू करण्याकरीता परवानगी मिळण्याबाबत 7) सोलापूर महानगरपालिका भवानीराम सिकची धर्मशाळा येथील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्याबाबत, 8) सोलापूर शहरातील शासनमान्य खाजगी झोपडपट्टीमधील प्रलंबित रमाई आवास योजनेचे प्रस्ताव मंजूर होण्याबाबत खासबाब म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा व इतर विविध प्रश्नांबाबत सोलापूर महानगरपालिका मा. आयुक्त यांना निवेदनाव्दारे मागणी केली.

यामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन 1995 नंतर बहुसंख्य रोजंदारी कर्मचारी, वाहन चालक कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना कायम करण्याकरीता सोलापूर महानगरपालिकेमध्ये ठराव पारित करण्यात आले. तसेच सेवक वर्ग निवृत्त समितीने देखील अंतिम प्रतिक्षा यादी तयार केलेली असून सदर यादीस मान्यता मिळालेली आहे. सदर कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून आजतागायत सेवा देत आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत मलेरिया विभागाकडील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता या पदावर सन 2016-17 मध्ये काम केलेले असून त्यांना सदर कामाचा अनुभव आहे. यापैकी बहुसंख्य सेवक हे आरोग्य निरीक्षक कोर्स पूर्ण केलेले आहेत. त्यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात वाढत असताना सदर कर्मचारी स्वत:चे जीव धोक्यात घालून कार्य केलेले आहेत. सदर कर्मचाऱ्यांचा मुदवाढीबाबत प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. तसेच 1) विविध संवर्गातील सर्व रोजंदारी बदली सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, 2) आकृतीबंद मान्यतेनुसार मंजूर झालेल्या सर्व जागा त्वरीत भरण्यात यावेत, 3) 7 वा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदि. व इतर विविध प्रश्नांबाबत व सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन 1995 नंतरच्या रोजंदारी कर्मचारी यांना कायम करण्यात यावे व मलेरिया विभागाकडील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता (S.F.W.) या पदाकरीता मुदतवाढ देण्यात यावी.

सोलापूर महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना Watag व WMS नुसार तासावर मासिक पगार अदा करणेचा आदेश आपल्या कार्यालयाकडून सन 2021 मध्ये काढून जेवढे तास काम तेवढ्या तासाचा पगार असे जाहिर करण्यात आले आहे. सदर कर्मचाऱ्यांना Watag व WMS लागू केल्यामुळे त्यांना प्रामुख्याने मोबाईलमध्ये रेंज न येणे, मोबाईलची बॅटरी उतरणे, कामावर असताना फोटो काढणारे अधिकारी वेळेवर फोटो न काढणे, काढलेले फोटो अपलोड करण्यास उशीर होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार महिनाभर काम करून देखील कमी मिळत आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज, बिगारी, मलेरीया विभागाकडील कर्मचारी, डी.एस. विभागाकडील कर्मचाऱ्यांचा माहे डिसेंबर 2021 चा पगार Watag व WMS पध्दतीने काढण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मासिक पगार पुर्ण महिनाभर काम करून देखील काही कर्मचाऱ्यांचा पगार शुन्य, काही कर्मचाऱ्यांचा पगार 20 ते 50 टक्यापर्यंत कमी निघाला आहे. सदर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. याकरीता सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या Watag व WMS नुसार पगार काढण्याबाबतचे आदेश रद्द करण्यात यावे.

सोलापूर शहरामध्ये विविध भागात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता 10 अभ्यासिका कार्यरत आहेत. कोव्हिड-19 च्या पार्श्वभुमीवर नव्याने लावलेल्या निर्बंधामध्ये अभ्यासिका वगळता इतर सर्व सरकारी, खाजगी, कार्यालये, हॉटेल, बार, मॉल, थिएटर इ. आस्थापनांना 50 टक्के स्वरुपामध्ये परवानगी देण्यात आली आहे. दि. 23 जानेवारी राज्यसेवा व दि. 26 फेब्रुवारीला गट-ब ची मुख्यपरिक्षा तसेच इतर काही स्पर्धा परिक्षा या फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार आहेत. सध्यस्थितीमध्ये अभ्यासिका बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. यासाठी सोलापूर शहरातील अभ्यासिका अखंडीत चालु ठेवण्यात यावे.

सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरीता खाजगी कोचिंग क्लासेस मोठ्याप्रमाणात चालविले जातात. कोव्हिड-19 च्या पार्श्वभुमीवर मागील दोन वर्षापासून लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्याप्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. सध्यस्थितीत कोव्हिड-19 च्या काळामध्ये सदरचे क्लासेस बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. तसेच इ. 10 वी ते इ. 12 वी व स्पर्धा परिक्षा काही दिवसांमध्ये घेण्यात येणार आहेत. शहरातील पॉझिटिव्हचे रेट अत्यंत कमी असल्यामुळे 50 टक्के विद्यार्थी क्षमतेने किमान दोन महिन्यांसाठी विद्यार्थ्यांकरीता क्लासेस सुरु करण्याकरीता परवानगी देण्यात यावी.

सोलापूर महानगरपालिका भवानीराम सिकची धर्मशाळा येथील रोजंदारी कर्मचारी सन 2005 पासून सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये रोजंदारी 3 कारकून, 2 रोजंदारी मजुर शिपाई, 2 सफाई कामगार असे एकूण 10 सेवकांचा समावेश आहे. सदर कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्याकरीता सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा ठराव क्र. 04, दि. 22/04/2016 नुसार सदर सेवकांना सोलापूर महानगरपालिका सेवक यादीमध्ये समाविष्ठ करण्याबाबत ठराव पारीत झालेला आहे. सदर ठरावानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांची नावे महानगरपालिकेच्या आस्थापना यादीमध्ये समाविष्ठ करून सेवा नियमित करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे. परंतू सदरच्या ठरावानुसार अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सोलापूर महानगरपालिका भवानीराम सिकची धर्मशाळा येथील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्यात यावे.

तसेच सोलापूर शहरातील शासनमान्य खाजगी झोपडपट्टीमधील प्रलंबित रमाई आवास योजनेचे प्रस्ताव मंजूर होण्याबाबत खासबाब म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा जेणेकरून गरजू गोर-गरीबांना रमाई आवास योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल व इतर विविध प्रश्नांबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाव्दारे मागणी केली.

यावेळी सोमपा गटनेता चेतन नरोटे, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, नागनाथ कासलोलकर, विविध सोमपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, क्लासेस असोसिशनचे अध्यक्ष कामतकर, अभ्यासिका केंद्राचे प्रमुख डोलारे आदि. उपस्थित होते.