सोलापूर,दि.23: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजनबाबत आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तत्काळ करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.
शासकीय, खाजगी रूग्णालयात कोविड रूग्णांवर उपचार करत असताना ऑक्सिजन पुरवठा, साठवणूक आणि त्याचे वहन सुरक्षित पद्धतीने करणे आणि रूग्णालयात आग लागू नये, यासाठी फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी आदेशात दिल्या आहेत.
सोलापूर शहर आणि ग्रामीण कार्य क्षेत्रात असणाऱ्या शासकीय, खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन साठवण यंत्रणा, पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन संबंधित इतर बाबी सुरक्षित आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबत त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे. दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र शहरमध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे तर ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे. दोन्हीकडील प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रूग्णालयांनी फायर ऑडिट करून त्यानुसार तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश श्री. शंभरकर यांनी दिले आहेत.
Leave a Reply