Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर,दि.23: सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने सोयाबीन भिजलेले आहे. यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असून बाजारातही सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामासाठी स्वत:कडील चांगले सोयाबीन बियाणे घरगुती उगवण क्षमता तपासून ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जयवंत कवडे यांनी केले आहे.

            सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने जिल्ह्यात पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियांण्यापासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. सोयाबीन बियाण्याचे बाह्य आवरण नाजूक व पातळ असल्याने त्यांची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवणूक करण्यापूर्वी बियाणे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपदरी / सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरुन चांगले वाळवावे. बियाणांतील आद्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्यापर्यंत आणावे. सोयाबीन बियाणे साठवणूक करण्यासाठी बियाणांची घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासावी. किमान 70टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे. वाळलेल्या बियाणांतील शेंगा, फोलपट्टे, काडीकचरा, मातीखडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या / नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते, त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड, ओलविरहीत व हवेशिर असले पाहिजे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्याचा वापर करु नये.

बियाणे साठवताना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे 100 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना 4 पोत्यापेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यापेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये. अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाणांवर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण क्षमता कमी होते. पोत्याची थप्पी जमीनीपासून  10 ते 15 से.मी. उंचीवर लाकडी फळ्यावर लावावी. पोत्याची रचना उभ्या आडव्या पध्दतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता व उगवण क्षमता जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये किटकनाशके व बुरशीनाशकाचा वापर करावा. तसेच उंदराचा उपद्रव्य टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीन बियाणांच्या पोत्याची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *