पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी शासनाकडून असं दिले आश्वासन ..

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली कुटुंबियांची भेट
सोलापूर, दि.९: भोगावती नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने देगावच्या विनायक आतकरे या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्याने वाहून जाऊन मृत्यू झाला होता. ही घटना दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

आज श्री. शंभरकर यांनी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील उपस्थित होते.

श्री.शंभरकर यांनी सांगितले की, मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीमधून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे.

बंधाऱ्यांची पाहणी
दरम्यान, श्री शंभरकर यांनी भोगावती नदीवरील बंधाऱ्याला भेट देवून पाहणी केली. शिवाय वाहून गेलेल्या शेतीची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, सरपंच अण्णा भिमराव घोडके, उपसरपंच अमर आतकरे, लघू पाटबंधाऱ्याचे उपअभियंता श्री कुलकर्णी, मंडळ अधिकारी श्री पांढरे उपस्थित होते.

मिशन कवचकुंडल पूर्ण करा
श्री शंभरकर यांनी देगाव येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देवून कोविड लसीकरणाची पाहणी केली. आज या उपकेंद्रावर १७० लसीकरण झाले. मिशन कवचकुंडल पूर्ण करण्याच्या सूचना देऊन लसीबाबतच्या ग्रामस्थांच्या शंका दूर केल्या. येत्या चार-पाच दिवसात १०० टक्के लसीकरण करण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी श्वेता पवार, आरोग्यसेविका उर्मिला आतकरे, आरोग्यसेवक प्रमोद घोडके, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

नरखेडमध्ये मतदान केंद्रांना भेटी
देगाव दौऱ्यावर असताना श्री शंभरकर यांनी नरखेडमधील तीन ठिकाणच्या मतदान केंद्रांची पाहणी केली. बूथ स्तर अधिकाऱ्यांना (बीएलओ) जास्तीत जास्त मतदान नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.