सोलापूर (प्रतिनिधी)- रेमेडिसीविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणे आणि कोरोना महामारीच्या बाबत प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा बाबत निषेध करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे काळे झेंडे दाखवत बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब पवार आणि बालाजी डोईफोडे यांनी घोषणाबाजी केली. बार्शी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या आंदोलकांनी दिलेल्या निषेध पत्रात, कोव्हीड 19 चा संसर्ग गेले अठरा महिन्यापासून आपल्या सोलापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शेकडो लोकांचा बळी गेला आहे तर हजारोंच्या संख्येने लोक बाधित झाले आहेत तसेच त्यांचे कोट्यवधी रुपये केवळ उपचारात खर्च झालेत, वास्तविक ही राष्ट्राची संपत्ती होती व आहे. अठरा महिन्यापासून वारंवार आपण कोरोना बाबत बैठक आणि आढावा घेतलेला आहे. कोरोनाची पहिली, दुसरी, तिसरी अशा लाटा येणार असल्याचे माहीत असताना आणि त्यामध्ये लाखो लोक बाधित होणार हे माहित असताना देखील आपण मंत्री मंडळाचे सदस्य व जिल्ह्याचे पालकमंत्री असून देखील आपली व जिल्हा प्रशासनातील आपत्कालीन व्यवस्थापनाची घटनात्मक जबाबदारी आपण व प्रशासनाने पार पडली नाही हे स्पष्ट होत आहे, कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन वायूची कमतरता आहे, जीवनावश्यक औषधे, इंजेक्शन यांची कमतरता आहे, काही औषधांचा काळाबाजार होतो आहे, कोव्हीड रुग्णालय व इतर रुग्णालय येथे बेड व इतर सुविधा यांची प्रचंड कमतरता आहे, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा फेल झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण वाढ होत असताना, आपण व इतर राजकीय नेत्यांनी बेजबाबदारीने मोठ्या सभा पंढरपूर व मंगळवेढा येथे घेतल्या आहेत, त्यामुळे देखील रुग्ण वाढ प्रचंड प्रमाणात झाली आहे.
पालकमंत्री या नात्याने आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होत असलेल्या गैरसोय बाबत, आपण, आपले प्रशासन, कायदेशीर रित्या जबाबदार आहात. शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश व मार्गदर्शक विशेष सूचना प्रमाणे प्रशासनाने कोरोना साथरोगा बाबत जनजागृती व प्रशासकीय व्यवस्था केलेली नाही. ग्राउंड लेव्हलवर जाऊन कोणीही काम केले नाही, लोकप्रतिनिधी व प्रशासन स्वतः नियम तोडत आहे. लोकांसाठी दहशत निर्माण केली गेली मात्र उपाय केला नाही, सुविधा दिली नाही.
नागरिकांकडून दंड वसुली केली पण जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यास आपण, लोकप्रतिनिधी व प्रशासन संपूर्णपणे फेल झाले. आदर्श लोककल्याणकारी राज्यात लोकांचा सहभाग घेणे गरजेचा असताना तसे न घेता दलाल, भ्रष्ट लोक, अवैध व्यावसायिक यांचे सल्ले घेतले गेले, त्यामुळे अवैध बाबी, काळा बाजार यांना प्रोत्साहन मिळाले, लोकांची लूट झाली. प्रामाणिक काम करणारे अधिकारी व लोक यांना दूर करून दलाल व हुजरेगिरी करणार्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आणि बार्शी तालुक्यात रूग्ण प्रचंड प्रमाणात वाढत आहेत व लोक मृत्यू पावत आहेत. रुग्ण वाढीस व नागरिकांच्या मृत्युस आपण व जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, त्यामुळे आपला व जिल्हा प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे निषेध पत्रात म्हंटले आहे. पालकमंत्री हे बार्शी मध्ये आढावा बैठक घेण्यासाठी आले होते यावेळी हा प्रकार घडला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Leave a Reply