परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत.

परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे.

ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जाईल.

यासाठी वैयक्तिकरित्या अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.