शेखर म्हेत्रे /माढा
माढा पोलीस स्टेशनच्या सबजेल मधून विविध गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेले चार आरोपींनी बनाव करून संधीचा फायदा घेत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ही घटना सोमवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. यातील आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर यास पोलिसांनी पुन्हा अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे.
जेल मधून 4 कैदी पळल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व कैदी खून, बनावट चलनी नोटा, पोक्सो, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. या चार जनांपैकी दोघे कुर्डुवाडी तर दोघेजण टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल झालेले आहेत.
या चौघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. सर्व यंत्रणा वेगाने तपास करत असताना
आकाश हा निमगाव शिवारातील एका उसाच्या फडात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून फिल्डिंग लावली. पोलिसांना पाहून आकाश पुन्हा पळाला आणि उसाच्या फडात जाऊन लपला. मात्र मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे त्याला पुढे पळता आले नाही.केवळ पाऊल खुणांवरून आकाशच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी पोलीस नाईक विशाल पोरे, पोलीस शिपाई संजय घोळवे,मनोज शिंदे ,होमगार्ड शिवाजी भांगे यांनी केली. आकाशचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे करीत आहेत.
अशी आहे हकीकत..
यामध्ये टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे दोन व कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील दोन अशा एकूण चार आरोपींनी पळ काढला आहे सिद्धेश्वर शिवाजी केचे आरोप (बनावट चलनी नोटा बाळगणे) गुन्हा नोंद टेंभुर्णी पोलीस स्टेशन, आकाश उर्फ अक्षय राॅकी भालेकर आरोप (302) गुन्हा नोंद टेंभुर्णी पोलिस स्टेशन, अकबर सिद्धाप्पा पवार आरोप (बेकायदेशीर पणे हत्यार बाळगणे) कुर्डूवाडी पोलीस स्टेशन, तानाजी नागनाथ लोकरे आरोप (पास्को) गुन्हा नोंद कुर्डूवाडी पोलीस स्टेशन असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की वरील चार आरोपींने अगदी हुशारीने नियोजन करून माढा सबजेल मधील आरोपी अकबर पवार यास झटका आल्याचा बनाव करून दरवाजा उघडल्याने वरील सर्व आरोपींनी पोलिस कर्मचारी शहाजी डुकरे यांना झटापटी करून सबजेल मधून पळ काढला.असून याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार यांनी सकाळी चार आरोपी झटापटी करून पळून गेले असल्याचे कळल्यानंतर माढा पोलिसांनी शहरातील ठिकठिकाणी नाकेबंदी करून या घटनेची माढा पोलीसात नोंद केली असून परिसरातील वैराग, कुर्डूवाडी ,टेंभूर्णी , पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती कळवुन या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागची दोन पथके व माढा पोलिस स्टेशन ची दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली असल्याचे माढा पोलिसांनी सांगितले .या घटनेचा पुढील तपास माढा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करत आहेत.
पलायनकर्त्या कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून आजूबाजूच्या जिल्ह्यातही तपास पथके रवाना केली आहेत. या कैद्यांचे फोटोही इतर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चार पैकी एकास अटक करण्यात आली आहे.
Leave a Reply