दि.2 : खासगी कंपनीत काम करणारे अनेकवेळा काही कारणास्तव कंपनी बदलतात. दुसऱ्या कंपनीत काम करतात. खासगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना कंपनी बदलताना प्रॉव्हिडंट फंडप्रमाणेच (PF) ग्रॅच्युइटीही (Gratuity) ट्रान्स्फर करण्याची संधी मिळू शकते.
म्हणजेच एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाताना ज्याप्रमाणे पीएफचे पैसे एका कंपनीतून दुसरीकडे ट्रान्स्फर केले जातात, त्याचप्रमाणे ग्रॅच्युइटीचे पैसेही ट्रान्स्फर (Gratuity Transfer) होऊ शकतील. या रचनेत बदल करण्यासंदर्भात सरकार, युनियन आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये सहमती झाली आहे आणि लवकरच नवा निर्णय लागू केला जाऊ शकतो.
खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पीएफप्रमाणेच ग्रॅच्युइटी ट्रान्स्फर करण्याचा पर्याय मिळेल. सरकार या निर्णयावर लवकरच अधिसूचना (Notification) जाहीर करू शकते. श्रम मंत्रालय, युनियन आणि इंडस्ट्री यांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत ग्रॅच्युइटी हा सीटीसीचा भाग बनवण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे, असं वृत्त CNBC आवाजने दिलं आहे. सामाजिक सुरक्षा अधिनियमाअंतर्गत ही तरतूद केली जाईल. कामाचे दिवस वाढवण्याबद्दल मात्र इंडस्ट्रीकडून सहमती व्यक्त करण्यात आलेली नाही. ग्रॅच्युइटीसाठी 15 ते 30 दिवसांच्या वर्किंग डेचा प्रस्ताव इंडस्ट्रीला मान्य नाही.
बहुतांश व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेकदा नोकरी बदलतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये (Private Sector) तर असं पाहायला मिळतं, की एखादी व्यक्ती आज इथे काम करते, तर काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ती दुसऱ्या कंपनीत काम करत असते. कंपनी बदलली की त्या व्यक्तीचा पीएफ तर ट्रान्स्फर होतो, पण आतापर्यंत ग्रॅच्युइटी ट्रान्स्फर होत नव्हती. आता मात्र नवी अधिसूचना आली तर तेही ट्रान्स्फर करण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमधल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
कोणत्याही कंपनीत कमीत कमी पाच वर्षं काम केल्यावर कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र होतो. ‘पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972’नुसार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी दिली पाहिजे. मात्र खासगी क्षेत्रातल्या अनेक कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती नसल्याने ते ग्रॅच्युइटीपासून वंचित राहतात.
कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी केव्हा मिळते?
• सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला (Retirement)
• एकाच कंपनीत कमीत कमी पाच वर्षं काम केलेला कर्मचारी जेव्हा नोकरी सोडतो किंवा त्याला कामावरून काढून टाकलं जातं, तेव्हा
• आजारपण किंवा अपघातामुळे मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर…
ग्रॅच्युइटीचा हिशेब कसा केला जातो?
एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत 20 वर्षं काम केलं आहे. बेसिक सॅलरी (Basic Salary) आणि डीए (DA) हे मिळून त्याचं एकूण वेतन 75 हजार आहे. महिन्यातले चार दिवस सुट्टीचे वजा करून 26 दिवसांचा महिना गृहीत धरला जातो. तसंच एका वर्षाचे 15 दिवस गृहीत धरून ग्रॅच्युइटीचा हिशेब केला जातो.
वरील उदाहरणाचं गणित असं मांडता येईल. 75,000 रुपये (एकूण वेतन) x (15/26) x 20 (वर्षं) = 8,65,385 रुपये ग्रॅच्युइटी