दि.३ : महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. विशेषता राज्यातील काही शहरात कोरोना रूग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात कठोर निर्बंध लादण्याची तयारी राज्य सरकारनं केली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केल्या गेलेल्या मुद्द्यांची माहिती दिली आहे.
“लॉकडाऊन शब्द वापरायची काही गरज नाही. पण कठोर निर्बंध लादण्याची नक्कीच गरज निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेUddhav Thackeray यांनी संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती प्रत्येकाकडून जाणून घेतली असून राज्याच्या सचिवांना त्यांनी योग्य ते आदेश दिले आहेत”, असं राजेश टोपे यांनी ‘टीव्ही-९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध
देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या टॉप-१० मधले तब्बल ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. या जिल्ह्यांमधील गर्दी थांबवावीच लागणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंधांची घोषणा मुख्यमंत्री ठाकरेंकडून केली जाण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर या शहरांमध्ये कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या शहरांसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
“राज्यात लॉकडाऊन शब्द वापरण्याची काही गरज नाही. जेव्हा तुमच्याकडची सर्व संसाधनं संपतात. परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा लॉकडाऊन करुन साखळी तोडण्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. पण सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यात कोरोना वाढू नये यासाठी निर्बंध लागू आहेत. तरीही लोक नियम पाळत नाहीयत हे वारंवार दिसून आलं आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळली आणि नियमांचं तंतोतंत पालन केलं तर लॉकडाऊनचा विषयच येणार नाही”, असं राजेश टोपे म्हणाले.