Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

गुरुपौर्णिमा लेखांक : 4

संत आणि गुरु

संत सकामातील आणि निष्कामातील प्राप्तीसाठी थोडेफार मार्गदर्शन करतात. काही संत लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी, तसेच वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना होणार्‍या दुःखाच्या निवारणासाठी कार्य करत असतात. अशा संतांचे कार्यच ते असते. एखाद्या संतांनी एखाद्या साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्यासाठी ते गुरु होतात. गुरु फक्त निष्कामातील (ईश्वर) प्राप्तीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करतात. एकदा एखादे संत गुरु म्हणून कार्य करू लागले की, त्यांच्याकडे येणार्‍यांच्या सकामातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, असे वाटणे हळूहळू न्यून होत जाऊन शेवटी ते बंदच होते; परंतु ते जेव्हा एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतात. प्रत्येक गुरु हे संत असतातच; मात्र प्रत्येक संत गुरु नसतात. असे असले तरी संतांची बहुतेक लक्षणे गुरूंना लागू पडतात.

*१. कार्यपद्धतीनुसार प्रकार :* ‘वैद्य तीन प्रकारचे असतात – उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जो वैद्य नाडी पाहून ‘औषध घे’ असे फर्मावून निघून जातो आणि रोगी औषध घेतो किंवा नाही याची काही विचारपूस करत नाही, तो कनिष्ठ वैद्य. जो वैद्य रोगी औषध घेत नाही हे पाहून ‘औषध घेतल्यास तू बरा होशील’, असे नानाप्रकारे गोड गोड बोलून त्याला समजावतो, तो झाला मध्यम वैद्य आणि जो वैद्य रोगी काही केल्या औषध घेतच नाही असे पाहून, त्याच्या छातीवर गुडघा रोवून त्याला जबरदस्तीने औषध घ्यायला लावतो, त्याला म्हणावे उत्तम वैद्य. त्याचप्रमाणे जे गुरु वा आचार्य उपदेश दिल्यानंतर शिष्यांची काही विचारपूस करत नाहीत ते आचार्य किंवा गुरु कनिष्ठ होत. शिष्यांना उपदेश ग्रहण करता यावा, त्यांचे कल्याण व्हावे, म्हणून पुनःपुन्हा त्यांना समजावून सांगतात अन् त्यांच्यावर प्रेम करतात ते मध्यम गुरु; परंतु शिष्य नीट अवधान देत नाहीत किंवा अनुरूप आचरण करत नाहीत हे पाहून जे आचार्य प्रसंगी जोरजबरदस्तीने का होईना, त्यांना तसे करायला लावतात, तेच उत्तम आचार्य होत.’ अर्थात् ही जोरजबरदस्ती स्थूल माध्यमातून नव्हे, तर सूक्ष्मातून केली जाते; म्हणून सर्वसाधारण व्यक्तीच्या लक्षात येत नाही.

*२. अंतर्गुरु आणि बाह्यगुरु :* ‘अंतर्गुरु आणि बाह्यगुरु यांच्यात फारसा भेद नसतो. तुम्ही बाह्यगुरूची करत असलेली पूजा वास्तविक तुमच्या हृदयस्थ गुरूलाच पोहचत असते. परमात्म्याला तुम्ही आपले हृदय अर्पण करता; त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काही करता, त्यापासून तुमच्या अंतर्यामी तुमचाच लाभ होतो. सहस्रदल-मंडलातील त्रिकोणात अंतर्गुरूचा वास असतो, असे गुरुगीतेतही सांगितले आहे –
‘‘अकठादित्रिरेखाब्जे-सहस्रदल मण्डले । हंसपाश्र्वत्रिकोणे च स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् ।। ५८ ।।’’
हा अंतर्गुरु सहस्रसूर्यासमान तेजःपुंज असतो; भेद इतकाच की, बाह्य सूर्यप्रकाशामुळे उष्णता निर्माण होते; पण अंतर्गुरूचा प्रकाश शीतल असतो. ध्यानाच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेणार्‍या प्रत्येकाला अंतर्गुरूचे दर्शन होते. सहस्रदलातील दिव्य प्रकाशात सतत चमचमणार्‍या नीलबिंदूच्या रूपाने गुरु वास करत असतात. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी वास करणार्‍या गुरूकडून सत्य काय आहे, ते समजले म्हणजे ज्याचे तुम्ही आजवर पूजन करत आलात तो बाह्यगुरु अंतर्गुरूहून भिन्न नसल्याची प्रचीति तुम्हाला येईल.’
एकदा तुमची अंतर्शक्ति जागृत झाली की, मग ती स्वतःच गुरुकृपा बनून तुम्हांला मार्गदर्शन करू लागते. अगदी पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत ती अंतर्शक्तिच तुम्हांला मार्गदर्शन करत राहते. ‘आपण पूर्ण आहोत आणि यापूर्वीही सतत पूर्णच होतो’, याची जाणीव तुम्हांला शेवटी होते.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’,
संकलक – हिरालाल तिवारी, सनातन संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *