सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलातील संख्याशास्त्र विभागामध्ये संख्याशास्त्र व जैवसंख्याशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 64 विद्यार्थ्यांना सायटेल स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर सर्विसेस लिमिटेड कंपनी, पुणे यांच्याकडून 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधनासाठी ही शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास घुटे यांनी दिली. सायटेल कंपनीतर्फे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम राबवले जातात. या अंतर्गतच 64 विद्यार्थ्यांना 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे. मागील वर्षीदेखील सायटेल कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य देण्यात आले होते.
संख्याशास्त्र अधिविभागामध्ये एमएस्सी संख्याशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू असून विद्यार्थ्यांची अधिक मागणी लक्षात घेऊन प्रवेश क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. याचबरोबर सोलापूर परिसरात मेडिकल क्षेत्राची सुरु असलेली वेगाने वाटचाल लक्षात घेऊन एमएस्सी जैवसंख्याशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यासही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. या विभागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी देखील आनंदित झाले आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.