उदगीर : कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी शेकापूर गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव मार्फत शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले.
कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व भाजीपाल्यांची साठवण ही कमी तापमानात आणि योग्य आद्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्य होते. शीत कक्षाचे तापमान कमी असल्याने भाजीपाला खराब न होता जास्त काळ टिकतो व त्याचा फायदा आपल्याला जास्त वेळ खाण्यासाठी व आठवडी बाजारात विकण्यासाठी मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त आर्थिक लाभ मिळू शकतो कारण जो भाजीपाला आठवडी बाजारामध्ये विकल्या जात नाही तो भाजीपाला ते साठवून ठेवू शकतात आणि त्याला पुढच्या आठवडी बाजारामध्ये ते नेऊन विकू शकतात. त्यामुळे ही एक शेतीसाठी पूरक अशी गोष्ट आहे.
शीत कक्षामध्ये कुठल्याच प्रकारची ऊर्जा वापर होत नाही, त्यामुळे याचा खर्च पण कमी असतो. शीत कक्षाच्या उभारणीसाठी साधारणपणे २०० विटा, वाळू, लाकडी खांब, बांबूंची चटई, टोपली ही साहित्य लागतात जी सहजपणे गावात उपलब्ध होतात. या पद्धतीच्या आकारमानाचे शीत कक्ष तयार करण्यासाठी कमी खर्च येतो व सहज आणि सोप्या पद्धतीने गावातील शेतकरी याचा उपयोग करू शकतात. ही सर्व माहिती सोप्या पद्धतीने ग्रामीण भागात कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत देण्यात आली. त्यामध्ये कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे कार्यरत असलेले विशेषग्य प्रा. एम.टी. लोंढे, प्राचार्य डॉ. ए.पी. सुर्यवंशी, डी.डी.ओ. डॉ. आनंद दापकेकर तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.आर. खंडागळे व ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एस.एन. वानोळे यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिदूत अरबाज बागवान, शिवराम बामनवाड, सुहास बनकर, आशिष बनसोडे, श्रेयस बिडवे व लक्ष्मण बिंगेवाड यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.