Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

जागतिक स्तरावर सापांच्या २४०० पेक्षाही अधिक प्रजाती आहेत. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील केवळ ३९९ सापांच्या प्रजाती विषारी आहेत. भारतात सापांच्या ३०० हुन अधिक प्रजातीचे साप आहेत. त्यापैकी केवळ ६० हुन अधिक प्रजातीचे साप विषारी असल्याचे तज्ज्ञांच्या मते वारंवार सिद्ध झाले आहे.

भारतात सर्वात लहान आकाराचा वाळा साप आहे तर अजगर हा सर्वात मोठ्या आकाराचा साप आढळतात. काही साप जमिनीवर, पाण्यात, झाडांवर, माळरानावर ते अन्नाच्या शोधत मनुष्य वस्तीमध्ये सुद्धा आढळतात.

आपल्या सोलापुरात काही अभ्यासकांच्या मते एकूण २६ प्रजातीचे साप आढळतात. त्यापैकी ५ प्रजातीचे विषारी साप आढळतात. ते म्हणजे #नाग_मण्यार_घोणस_फुरसे_आणि_पोवळा हे पाच विषारी प्रजातीचे साप आढळतात. तसेच सोलापूर जिल्ह्यात दोन प्रजातीचे निमविषारी साप देखील आढळतात. पहिला मांजऱ्या आणि दुसरा हरणटोळ. या सापांच्या विषाने मनुष्यावर मृत्यू होण्याइतपत परिणाम होत नाही. या सापांच्या दंशाने छोटे प्राणी-पक्षी मरू शकतात.

साप हा पूर्णतः मांसाहारी आहे. मुंग्यापासून ते अळी, उंदीर, पक्षी,बेडूक, वटवाघूळ, ससे, हरीण तसेच साप हा इतर सापांना देखील खातो. सापांना तीन ते चार फुटाच्या पलीकडचे दिसत नाही. त्यांना फक्त कृष्णधवल प्रतिकृती दिसते.

साप डुक धरतो, सापाला केसं असतात, सापांच्या डोक्यावर नागमणी असते, गर्भवतीन महिलेने सापाला पाहिल्यास साप आंधळा होतो, साप पुंगीच्या आवाजाने डोलतो तसेच साप दूध पितात मनुष्याने अश्या विविध अंधश्रद्धा, गैरसमज सापांच्या बाबतीत समाजात मांडले आहे.

#सर्प_दंश_टाळण्यासाठीचे_उपाय
सापांचा घरात प्रवेश टाळण्यासाठी घरातील उंदरांची व पालीची संख्या वाढू देऊ नये. सरपण, अडगळ, कचरा घराच्या आजूबाजूला ठेऊ नये. घराच्या आसपास पाणी साठू देऊ नये कारण त्या पाण्यात बेडकांचा वावर असल्यामुळे साप अन्नाच्या शोधात येऊ शकतो.

#सर्पदंशानंतरचा_प्रथोमोपचार
सर्पदंश झालेली जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. साप चावलेल्या व्यक्तीस मानसिक आधार द्यावा. नाग व मण्यार साप हाताला किंवा पायाला चावल्यास मनगटाला किंवा मांडीला अवळपट्टी बांधावी. बांधलेली अवळपट्टी दर दहा मिनिटाला सैल करत राहावी. घोणस व फुरसे साप चावल्यास अवळपट्टी किंवा बँडेज बांधू नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

#सर्पदंश_झाल्यास_काय_करू_नये.
तोंडाने विष ओढण्याचा प्रकार करू नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस जास्त हालचाल करू देऊ नये. साप मारून रुग्णालयात घेऊन जाऊ नये.सर्पदंश झालेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काप, चिरा जखमेवर घेऊ नये. तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीस कोणत्याही मांत्रिकाकडे अथवा मंदिरात घेऊन जाऊ नये. मिरच्या अथवा कडू लिंबाचा पाला रुग्णास खाऊ घालू नये.

घरात किंवा घराच्या आजूबाजूला साप निघाल्यास जवळच्या सर्परक्षकाशी संपर्क साधावा. अथवा #वनविभागाच्या_१९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

सापाला मारणे, साप बाळगणे किंवा सापांचे प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सापांबरोबर स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये.

साप हा खरा आपला मित्र आहे. साप हा निसर्ग साखळीतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. उंदरासारख्या उपद्रवी जीवावर नियंत्रण ठेवण्याचे मोलाची मदत करतो.

वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *